UP ATS ISI spy arrested |
दिल्ली : पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) साठी हेरगिरी करण्यात सहभागी असलेल्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.
रामपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शहजादला शनिवारी मुरादाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींवर देशभरात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान शहजादला अटक करण्यात आली. या कारवाईत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर्ससह अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, इस्लामाबादच्या गुप्तचर संस्थेसाठी भारत-पाकिस्तान सीमेवरून तस्करी करण्यात त्याचा सहभाग असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर शहजादवर पाळत ठेवण्यात आली होती.
तपासात असे दिसून आले की तो अनेकवेळा पाकिस्तानला गेला होता. सौंदर्यप्रसाधने, कपडे, मसाले आणि इतर वस्तूंचा सीमापार बेकायदेशीर व्यापार तो करायचा. पोलिसांनी सांगितले की, तस्करी रॅकेट, हेरगिरी कारवायांसाठी तो नेतृत्व करायचा. शहजादवर अनेक आयएसआय कार्यकर्त्यांशी जवळचे संपर्क असल्याचा आणि त्यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुरवण्याचा आरोप आहे. गुप्त माहिती देण्याबरोबरच तो भारतातील आयएसआयसाठी कारवाया सुलभ करत होता. चौकशीत असेही आढळून आले की, आयएसआयच्या सूचनांनुसार, शहजादने भारतात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी एजंटना निधी हस्तांतरित केला होता. त्याने रामपूर आणि उत्तर प्रदेशमधील अनेक लोकांना आयएसआयशी संबंधित कारवायांसाठी भरती करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानात पाठवण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या व्यक्तींसाठी बनावट व्हिसा आणि प्रवास कागदपत्रे आयएसआयच्या मदतीने तयार करण्यात आली होती. शहजादने आयएसआय एजंट्सना भारतीय सिम कार्ड मिळवून दिले आणि ते पोहोच केले. लखनऊमधील एटीएस पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.