

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत दिवाळीच्या दिवशी फटाक्यांसह गोळ्याही झाडण्यात आल्या. शाहदरा परिसरात दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादाखक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर एकजण जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.31) रात्री साडेआठच्या सुमारास फरश बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची माहिती पीसीआरला मिळाली. घटनास्थळी पोलिसांना आकाश शर्मा (वय.40), त्याचा पुतण्या ऋषभ शर्मा (वय.16) आणि मुलगा क्रिश (10) यांच्यावर गोळ्या झाडल्याचे दिसून आले. या गोळीबारात आकाश आणि ऋषभ यांचा मृत्यू झाला आहे. पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. (Shahdara Double Murder Case)
हल्लेखोरांनी आकाश शर्मावर गोळी झाडण्यापूर्वी त्याच्या पायावर गोळीबार केला. सर्व पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळच उभा असलेला आकाश शर्मा यांचा मुलगा क्रिश आणि पुतण्या ऋषभ यांनाही गोळ्या लागल्या. आकाश शर्मा आणि ऋषभ शर्मा यांना रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर क्रिश शर्मा यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रथमदर्शनी हे वैयक्तिक वैमन्यसातून असल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(Shahdara Double Murder Case)
शाहदरा येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपींनी 17 दिवसांपूर्वी हत्येचा कट रचला होता. अटकेत असलेला अल्पवयीन व मृत आकाश व त्याच्या कुटुंबीयांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तपासानुसार, मृत आणि आरोपी यांच्यात पैशावरून वाद सुरू होता. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाल्याची माहिती. दिल्ली पोलिसांनी दिली आहे.