

पुढारी ऑनलाईन डेस्क: Heatwave Alert | देशभरात झपाट्याने हवामानात बदल होत आहे. बहुतांश राज्यात कमाल तापमान रोज नवा उच्चांक गाठत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील ४ दिवस देशातील अनेक राज्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा आज (दि.१६) दिला आहे. देशातील अनेक प्रदेशांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअस ओलांडत असल्याने, अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इशारे आणि सूचना जारी केल्या आहेत.
देशभरात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने आज (दि.१६) प्रसिद्ध केलेल्या हवामान बुलेटिनमध्ये दिला आहे. १६ ते १८ मार्च दरम्यान अंतर्गत ओडिशात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
ओडिशाच्या अनेक ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट, झारखंडमध्ये अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी आणि छत्तीसगडमध्ये देखील काही ठिकाणी पुढील ४ दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. रविवार १६ मार्च आणि १७ मार्च रोजी झारखंड, पश्चिम बंगाल, विदर्भ, उत्तर तेलंगणा येथे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. रविवार १६ मार्चला छत्तीसगड, संपूर्ण उत्तर कर्नाटकात १८ ते २० मार्च दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
ईशान्य भारतात १६ आणि १७ मार्च रोजी वादळी आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. २० ते २३ मार्च दरम्यान पूर्व मध्य भारतात विखुरलेला ते बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.१६) चंद्रपूरमध्ये ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे ते भारतातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक बनले. महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी, सोलापूर आणि वर्धा यासारख्या इतर भागातही ४१ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेसोबत कमी आर्द्रता असल्याने लोकांच्यामध्ये अस्वस्थता वाढत आहे. विदर्भातील अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा ३-६ अंश सेल्सिअस जास्त आहे. उष्णतेच्या लाटेपासून तात्काळ आराम मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. येत्या काही दिवसांतही विदर्भात उष्णता कायम राहणार असल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.