Indian Delegations Abroad |
Indian Delegations Abroad | अमेरिकेपासून सौदीपर्यंत... ५९ लोकांचे ७ शिष्टमंडळ जगाच्या दौऱ्यावरFile Photo

Indian Delegations Abroad | अमेरिकेपासून सौदीपर्यंत... ५९ लोकांचे ७ शिष्टमंडळ जगाच्या दौऱ्यावर

पाकिस्तानचे दहशतवादाबाबतचे धोरण संपूर्ण जगासमोर उघडे करणार
Published on

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत सरकार या महिन्याच्या अखेरीस विविध देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवणार आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका मांडण्यासाठी आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडीत पकडण्यासाठी खासदार, नेते, राजदूत यांचे ७ शिष्टमंडळ जगभर प्रवास करणार आहेत.

केंद्र सरकारने शिष्टमंडळात समाविष्ट असलेल्या सर्व खासदारांची नावे देखील जाहीर केली आहेत. प्रत्येक शिष्टमंडळात खासदार आणि राजनयिकांसह ७-८लोक आहेत, प्रत्येक शिष्टमंडळ ४-५ देशांना भेट देणार आहे. या माध्यमातून भारत जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्धचा 'शून्य सहनशीलते'चा संदेश पोहोचवणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांची आणि त्यात समाविष्ट असलेल्या इतरांची यादी जाहीर केली आहे.

Indian Delegations Abroad |
सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर

बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली ७ खासदारांचे शिष्टमंडळ सौदी अरेबियाला जाणार

सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पहिल्या गटात ७ खासदार आहेत. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरियाचा प्रवास करतील. या गटात भाजप खासदार निशिकांत दुबे, एस फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, सतनाम सिंह संधू, गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत राजदूत हर्षवर्धन श्रृंगला असतील.

भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील खासदारांचा दुसरा गट यूके, फ्रान्स, जर्मनी, युरोप, इटली आणि डेन्मार्कला भेट देईल. यामध्ये भाजप खासदार डी. पुंडेश्वरी, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार गुलाम अली खटाना, काँग्रेस खासदार डॉ. अमर सिंह, भाजप खासदार समिक भट्टाचार्य, एम. जे. अकबर यांचा समावेश असेल. त्यांच्यासोबत राजदूत पंकज सरन असतील.

खासदारांचा तिसरा गट जदयू खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देईल. यामध्ये भाजप खासदार अपराजिता सारंगी, तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण, भाजप खासदार ब्रिजलाल, माकपचे खासदार डॉ. जॉन ब्रिटास, भाजप खासदार प्रदान बरुआ, हेमांग जोशी आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा समावेश आहे. या गटात राजदूत मोहन कुमार असतील.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचा चौथा गट युएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनला भेट देईल. या गटात भाजप खासदार बासुरी स्वराज, आययूएमएल खासदार ईटी मोहम्मद बशीर, भाजप खासदार अतुल गर्ग, बीजद खासदार सस्मित पात्रा, भाजप खासदार मनन मिश्रा आणि माजी खासदार एसएस अहलुवालिया यांचा समावेश आहे. या गटात राजदूत सुजन चिनॉय देखील असतील.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचे पाचवे शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देणार आहे. यामध्ये लोजप खासदार शांभवी, झामुमो खासदार डॉ. सरफराज अहमद, तेदेप खासदार जी. एम. हरीश बालयोगी, भाजप खासदार शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता, शिवसेना खासदार मिलिंद देवरा, भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचा समावेश असेल. या गटात राजदूत तरनजीत सिंग संधू असतील.

द्रमुक खासदार के. कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील खासदारांचा सहावा गट स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशियाला भेट देईल. या गटात सपा खासदार राजीव राय, नॅशनल कॉन्फरंसचे खासदार मियां अल्ताफ अहमद, भाजप खासदार कॅप्टन ब्रजेश चौटा, राजद खासदार प्रेमचंद गुप्ता, आप खासदार अशोक कुमार मित्तल यांच्या नावांचा समावेश आहे. या गटात राजदूत मंजीव एस पुरी आणि जावेद अश्रफ यांचा समावेश असेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचा सातवा गट इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिकेला जाईल. या गटात भाजप खासदार राजीव प्रताप रुडी, आप खासदार विक्रमजीत सिंह, काँग्रेस खासदार मनीष तिवारी, भाजप खासदार अनुराग ठाकूर, तेदेप खासदार लवू श्रीकृष्ण देवरायालू, आनंद शर्मा, व्ही मुरलीधरन यांचा समावेश असेल. या गटात राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांचाही समावेश असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news