

Kolkata Gangrape Case
"एखाद्या मित्रानेच आपल्या मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करता येईल? पोलीस काय शाळांमध्ये थांबणार आहेत का?", अशी धक्कादायक प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांनी कोलकाता विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीचे तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेशी असलेल्या संबंधांवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, "लज्जास्पद" अशा शब्दांमध्ये भाजपने कल्याण बॅनर्जी यांच्या प्रतिक्रियेचा तीव्र निषेध केला.
"एखाद्या मित्रानेच आपल्या मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करता येईल? पोलीस काय शाळांमध्ये थांबणार आहेत का?" , असा सवाल करत कल्याण बॅनर्जी म्हणाले की, विनयभंग कोण करते? काही पुरुषच करतात; महिलांनी अशा विकृत पुरुषांविरुद्धच लढले पाहिजे. गुन्हा कोणत्याही एका पक्षापुरता किंवा संघटनेपुरता मर्यादित नसतो, असेही खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे; पण जर मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल, तर हा प्रकार कसा असू शकतो? सुरक्षेची परिस्थिती सर्वत्र सारखीच आहे. पुरुषांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. तुमचा एक राजकीय अजेंडा आहे, म्हणूनच तुम्ही हा माईक घेऊन प्रश्न विचारायला आला आहात, अशा शब्दांमध्ये त्यांनी माध्यमांवरही टीका केली.
दक्षिण कोलकाता विधी महाविद्यालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी कायद्याच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले. . पीडितेने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या गार्डच्या खोलीत तीन जणांनी आमिष दाखवून नेले. ३१ वर्षीय माजी विद्यार्थी आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वकिली करणारा मनोजित मिश्रा आणि सध्याचे दोन विद्यार्थी, जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखोपाध्याय (२०) यांचा समावेश आहे. तिला खोलीत कोंडून ठेवण्यात आले आणि मिश्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तर इतर दोघे तिथे उभे राहून त्याला मदत करत होते. डोक्यात हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली, पॅनिक अटॅक आल्यावर तिने इनहेलरसाठी गयावया केली आणि याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला आहे. डॉक्टरांनी शारीरिक हल्ला, चावण्याच्या खुणा, ओरखडे आणि जबरदस्तीने लैंगिक अत्याचार झाल्याचे पुरावे नोंदवले आहेत. तिन्ही आरोपींना अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, हल्ल्यादरम्यान आपले चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला होता.
पीडितेच्या तक्रारीतील आरोपींपैकी एक असलेल्या मनोजित मिश्रा याचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी (TMC) संबंध असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वाद अधिकच चिघळला आहे. तो माजी विद्यार्थी आणि कॉलेजच्या TMCP (तृणमूल काँग्रेस छात्र परिषद) युनिटचा अनधिकृत प्रमुख आहे. सगळेजण त्याचे ऐकत असत," असे पीडितेने जबानीत म्हटले आहे.मिश्राचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि राज्याच्या आरोग्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्यासह तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. भाजपने मिश्राचे पक्षाच्या कार्यक्रमांमधील अनेक फोटो प्रसिद्ध केले असून, ही घटना "बलात्काऱ्यांना राजकीय संरक्षण" दिल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे आणि पक्षाच्या संबंधांवर सरकारने आपले मौन सोडावे, असे आव्हान दिले आहे.
या प्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री शशी पांजा म्हणाल्या, "आम्हाला एका महिलेच्या वेदनेचे राजकारण करायचे नाही. पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडले जाणार नाही. पश्चिम बंगाल सरकारचा बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेले 'अपराजिता विधेयक' राष्ट्रीय स्तरावर रोखल्याचा आरोपही श्रीमती पांजा यांनी भाजपवर केला. हे विधेयक पश्चिम बंगाल विधानसभेने मंजूर केले होते. "महिलांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्याला विरोध करताना महिलांच्या सन्मानाबद्दल बोलू नका," असे त्या म्हणाल्या.