

"विद्यार्थ्याला रागावले म्हणून तो जीवन संपवले, अशी घटना घडू शकते याची कल्पनाही सामान्य माणूस करू शकत नाही. विद्यार्थ्याला रागावणे म्हणजे त्याला जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे," असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्याने जीवन संपविल्याप्रकरणी शिक्षकाची निर्दोष मुक्तता केली आहे.
तामिळनाडूमधील एका शाळेतील वसतीगृहामध्ये राहणार्या विद्यार्थ्याने शिक्षकाकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी दुसर्या एका विद्यार्थ्याला फटकारले. तसेच पुन्हा अशी चूक हाेवू नये, असेही बजावले हाेते. यानंतर विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले होते. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल झाला. मद्रास उच्च न्यायालयाने विद्यार्थी मृत्यू प्रकरणी शिक्षकाला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत दोषी ठरवले. त्यांना शिक्षा ठाेठावली. मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात शिक्षकाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
शिक्षकाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना नमूद केले की, "शिक्षकाची कृती ही पूर्णपणे योग्य होती. ते संबंधित विद्यार्थ्याला रागावले. त्यांनी पालक या भावनेतून ही कृती केी होती. तसेच संबंधित विद्यार्थी पुन्हा अशी चूक करु नये. मुलांच्या वसतिगृहात शांतता आणि सौहार्द राखता यावे, हीच त्यांच्या कृतीमागील भावना होती. त्यांचे आणि मृत विद्यार्थ्याचे कोणतेही वैयक्तिक संबंध नव्हते."
शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने स्पष्ट केले की, "संबंधित शिक्षकाकडे एका विद्यार्थ्याने तक्रार केली होती. त्यामुळे त्यांनी एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. ते विद्यार्थ्याला रागावले. मात्र हे कृत्य करत असताना त्यांचा कोणताही वाईट परिणाम घडवण्याचा हेतू होता असे कोणतेही पुरावे दिसत नाही. पालक या भावनेतून शिक्षक संबंधित विद्यार्थ्याला रागावले होते. त्यामुळे ते विद्यार्थ्याला रागावले याचा अर्थ त्याला जीवन संपविण्यास प्रवृत्त केले असा होत नाही." तसेच मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत ठाेठावलेली शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकाची निर्दोष मुक्तता केली.