

पुढारी ऑनलाईन डेस्क
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आज १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना झटका दिला. एसबीआयने सर्व कालावधीच्या कर्जावरील व्याजदरात १० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१० टक्के वाढ केली आहे. ही व्याजदरवाढ १५ ऑगस्ट २०२४ पासून लागू झाली आहे. या बदलामुळे विविध कालावधीच्या कर्जावर परिणाम होणार आहे. यामुळे बँकेतून कर्ज घेणे महाग होणार आहे. तसेच तुमच्या कर्जाचा EMI वाढणार आहे.
बँकेकडून व्याजदरवाढ करण्याचा हा सलग तिसरा महिना आहे. या बदलाचा भाग म्हणून विविध मुदतीसाठी निधी आधारित कर्जदर (MCLR) च्या किरकोळ किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. MCLR म्हणजे बँक ज्या व्याजदराने ग्राहकांना कर्ज देते.
हा नवीन दर लागू झाल्यामुळे तीन वर्षांच्या कालावधीसाठी एसबीआयचा एमसीएलआर ९ टक्क्यांवरून ९.१० टक्क्यांवर गेला आहे. तर ओव्हरनाइट एमसीएलआर आता ८.१० टक्क्यांवरून ८.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. एक वर्षाच्या, दोन वर्षांच्या आणि तीन वर्षांच्या कर्जासाठी MCLR दर आता अनुक्रमे ८.९५ टक्के, ९.०५ टक्के आणि ९.१० टक्के एवढा आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या पतधोरण विषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee) बैठकीत बेंचमार्क रेपो दर ६.५ टक्के जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता बँकांद्वारे व्याजदरवाढ केली जात आहे. MCLR हा किमान व्याज दर स्वरुपात काम करतो; ज्याच्या खाली बँकांना आरबीआयने मंजूर केलेल्या काही प्रकरणांशिवाय कर्ज देण्याची परवानगी नसते.
MCLR मध्ये सतत होणारी वाढ ही विविध कालावधीतील कर्जांवर परिणाम करते. यातून कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होणार असल्याचे संकेत मिळतात.