

नवी दिल्ली : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद पुन्हा एकदा संसदेत उमटले. इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात जोरदार निदर्शने केली. काँग्रेस नेत्या खा. प्रियंका गांधी देखील यावेळी आंदोलनात सहभागी झाल्या. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांसह अन्य राज्यातील खासदारही यावेळी आंदोलनात सहभागी होते. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे.
काही दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे तीव्र पडसाद राजधानी दिल्लीत उमटत आहेत. या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी लोकसभेत केली होती. लगेच दुसऱ्या दिवशी संसद परिसरात बजरंग सोनवणे यांनी मोठे आंदोलन केले. यात राज्यातील इंडिया आघाडीचे बहुतांश खासदारांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे या आंदोलनाला उपस्थित होत्या. इंडिया आघाडीचे राज्याबाहेरील खासदारही या आंदोलनाला उपस्थित होते. त्यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य समजुन घेतले आणि बजरंग सोनवणेंच्या मागणीला समर्थन दिले.
या आंदोलनानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे, यातील खरे मारेकरी शोधले पाहिजेत. या प्रकरणात आतापर्यंत ३ आरोपी अटकेत आहेत मात्र आणखी काही आरोपी मोकाट आहेत. अपहरण आणि हत्या प्रकरणातील खऱ्या सुत्रधाराला अटक व्हावी पोलिसांनी निपक्षपातीने काम केले पाहिजे, ज्या पोलीस अधिकाऱ्याला या प्रकरणात निलंबित केले त्यांना सहआरोपी केले पाहिजे कारण घटनेपूर्वी संबंधित अधिकारी आरोपींसोबत होते. त्यांचे फोन डिटेल्स तपासले पाहिजे. तसेच पोलीस अधीक्षकांची बदली केली तरच आम्हाला न्याय मिळेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर चौकशी करण्याचा शब्द दिला आहे, असेही ते म्हणाले.
बजरंग सोनवणे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले की सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल मात्र त्यात अधिकारी कोण असेल हेही महत्वाचे आहे. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे. घ़डलेल्या याबाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या स्वताच्या सुरक्षेबाबत बोलताना ते म्हणाले की, मला कुणाचीही भीती नाही मात्र शासनाला वाटत असेल तर त्यांनी संरक्षण द्यावे, तशी मागणी वरीष्ठ स्तरावर काही सहकाऱ्यांनी केली आहे.