

Why Lok Sabha Speaker Somnath Chatterjee scolded Kiren Rijiju in 2004
नवी दिल्ली : लोकसभा, राज्यसभेत आरोप-प्रत्यारोप करणारे खासदार, घोषणाबाजी करणारे खासदार आपण नेहमीच बघतो. पण अधिवेशनादरम्यान या खासदारांसोबत काही गमतीशीर घटनाही घडतात. असाच एक किस्सा संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितला. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावर किरण रिजिजूंनी चक्क तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींकडे खासदारांसाठी धूम्रपान कक्ष सुरू करावं, अशी मागणी केली होती. ही मागणी ऐकताच चॅटर्जींनी रिजिजूंना झापलं होतं.
शनिवारी नवी दिल्लीत संसदरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात महाराष्ट्राच्या सात खासदारांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मत व्यक्त करताना केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी भन्नाट किस्सा सांगितला.
रिजिजू म्हणाले, ‘मी नवनिर्वाचित खासदार होतो. त्यावेळी डाव्या पक्षांचे 60 पेक्षा जास्त खासदार होते. मी तेव्हा सर्वात तरुण खासदारांपैकी एक होतो. डाव्या पक्षांच्या खासदारांनी मला लोकसभा अध्यक्षांकडे एक विनंती करा असं सूचवलं. संसदेत आधी सेंट्रल हॉलमध्ये धूम्रपानाला परवानगी होती. पण आता संसद परिसरात धूम्रपान बंदी असल्याने खासदारांसाठी संसद परिसरात एक छोटे धूम्रपान कक्ष सुरू करावे अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे करा असं रिजिजू यांना सांगण्यात आले.
वरिष्ठ खासदारांची ही मागणी घेऊन रिजिजू तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींना भेटायला गेले. चॅटर्जींनी धूम्रपान कक्षाची मागणी ऐकताच रिजिजू यांना झापले. ‘तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात आणि आपली ही पहिली भेट आहे. तुम्ही अशी मागणी घेऊन येण्याऐवजी काही चांगला मुद्दा घेऊन माझ्याकडे आला पाहिजे होता. तुम्हाला जनतेने यासाठी निवडून दिलेले नाही’, असं चॅटर्जींनी रिजिजूंना सांगितले. 'नंतर चॅटर्जींनी मला बोलवून घेतलं. मला सांगितलं तुम्ही पहिल्यांदा भेटायला येताना काही तरी चांगलं काम घेऊन आलं पाहिजे होतं. तुम्ही चांगल्या कामासाठी आला नव्हता. तुम्हाला कोणीतरी पाठवलं होतं हे माहितीये', अशी आठवणही त्यांनी सांगितली.
भारतात खासदार होणं हे आव्हानात्मक
भारतातील खासदारांवरील अपेक्षांचं ओझं यावरही रिजिजूंनी भाष्य केले. '2004 मध्ये मी पहिल्यांदा इंग्लंडमधील संसदेत गेलो होतो. तेव्हा मी भारत आणि परदेशातल्या खासदारांमधील फरक अनुभवला. दोन देशांमधील खासदार कोणत्या अडचणींचा सामना करतात याची तुलना होऊ शकत नाही. तिथे 60 हजार लोकांमधून खासदार निवडून येतो. आपल्या इथे 20 लाख मतदार खासदार निवडून देतात. भारतात सकाळी उठल्यापासून घरात लोकांची रांग असते. नातेवाईकाला अटक झालीये त्याला सोडवा, पैशांची मदत हवी अशा असंख्य वैयक्तिक समस्या घेऊन लोक खासदाराकडे जातात. परदेशात असं नाही. तिथे लोक मतदारसंघातील समस्यांसाठी खासदाराकडे जातात. तेही खासदाराच्या घरी जात नाही, ते संसदेत खासदाराच्या कार्यालयात जातात. भारतातील खासदारांसमोर असंख्य आव्हान असतात. मतदारांच्या अपेक्षा, पक्षाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. तुम्हाला नियम माहिती असली पाहिजे. भारताचा एक खासदार दिवसरात्र मेहनत करतो, पण त्यांच्याच पदरी जनतेच्या शिव्या देखील पडतात', असंही रिजिजूंनी सांगितले.