Nepal Protest Parliament :
नेपाळमध्ये सरकारविरूद्ध दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन आता अराजकतेकडे झुकत चाललं आहे. आंदोलकांचा पवित्रा पाहून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथील परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला असून आंदोलक आता संसदेत घुसले असून त्यांनी जाळपोळ सुरू केली आहे.
नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिल्यानंतरही आंदोलन थांबण्याचं नाव घेत नाहीये. आंदोलकांनी ओली यांचं बालकोट भागातील वैयक्तिक घर पेटवून दिलं आहे. त्याचबरोबर आंदोलन संसदेचं गेट तोडून आत शिरल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. संसद परिसरातून धुराचे लोट आणि आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. एवढंच नाही तर संसदेच्या इमारतीला देखील आग लावण्यात आल्याचं दिसलं. संसदेच्या आवारात हजारो आंदोलन झेंडा घेऊन पोहचले होते. त्यांनी पंतप्रधान केपी ओली यांच्याविरूद्ध घोषणाबाजी केली.
दरम्यान, कालपासून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरील घातलेली बंदी उठवली. मात्र आंदोलकांनी भ्रष्टाचार आणि परिवारवाद या मुद्यावरून दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू ठेवलं. या आंदोलनानं उग्र रूप धारण केलं. दबाव वाढतोय आणि परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहिल्यानंतर पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला. इतर मंत्र्यांनी देखील राजीनामा दिला असून या सर्वांना लष्कराच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.