PM मोदी CJI चंद्रचूड यांच्या घरी! 'आम्हाला न्याय मिळेल का?'; राऊतांचा सवाल
पुढारी ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी बुधवारी संध्याकाळी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांच्या निवासस्थानी जाऊन गौरी-गणपतीची आरती करून दर्शन घेतले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. पण पीएम मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरुन जोरदार टीका करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयीन निःपक्षपातीपणाबद्दल जनतेच्या मनात शंका निर्माण होऊ शकते, असा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, "गणेश चतुर्थीत लोक एकमेकांच्या घरी जातात. पंतप्रधानांनी आतापर्यंत किती घरांना भेटी दिली याची माहिती माझ्याकडे नाही. दिल्लीत आमचे महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र मंडळासह अनेक ठिकाणे आहेत.''
"पण पीएम मोदींनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांनी एकत्र गणपतीची आरती केली. संविधानाच्या रक्षकांनी अशा प्रकारे राजकीय नेत्यांची भेट घ्यावी की नाही ही आमची चिंता आहे. कारण यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होते," असे राऊत यांनी पुढे म्हटले.
'आम्हाला तारीख पे तारीख आणि....'; राऊतांचा टोला
''EVM ला क्लीन चीट, महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या घटनाविरोधी सरकारच्या सुनावणीला तारीख पे तारीख, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामीनावर तारीख पे तारीख... हे सर्व का होत आहे? क्रॉनॉलॉजी समजून घ्या,'' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी पीएम मोदी यांचा CJI चंद्रचूड यांच्या घरातील गणपती आरतीचा व्हिडिओ शेअर करत दिली.
CJI आम्हाला न्याय देऊ शकतील का?,राऊतांचा सवाल
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. पण आम्हाला न्याय मिळेल की नाही? याबद्दल शंका वाटते. आमच्या केसमध्ये, केंद्र सरकार प्रतिपक्ष आहे. सरन्यायाधीशांनी या खटल्यापासून स्वतःला दूर ठेवावे. कारण त्यांचे या खटल्यातील अन्य पक्षाशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. अशा परिस्थितीत सरन्यायाधीश आम्हाला न्याय देऊ शकतील का?, असा सवाल राऊत यांनी केला.
'...आणि महाराष्ट्राच्या मनात एक शंका निर्माण झाली'
आम्हाला तारीख पे तारीख मिळत आहेत आणि घटनाविरोधी सरकार अजूनही सत्तेवर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. पण आम्हाला न्याय मिळत नाही आणि पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी खूप रस दाखवत आहेत. जे सरन्यायाधीश आम्हाला न्याय देणार आहेत, त्यांच्याशी पंतप्रधानांचे असे जवळचे सबंध... त्यामुळे काल महाराष्ट्राच्या मनात एक शंका निर्माण झाली." असे राऊत यांनी नमूद केले आहे.

