Sanjay Raut On India Vs Pakistan Match :
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनी पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यावर त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर फडणवीस यांच्यावर देखील टोलेबाजी केली. त्याचबरोबर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होत असलेल्या सामन्यावर देखील भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी पंतप्रधान अनेक महिन्यानंतर अशांत मणिपूरचा दौरा करत असल्यावरून टीका केली. ते म्हणाले जाऊद्या, त्यांच्या दौऱ्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. मणिपूरमध्येच त्यांना विरोध होत आहे. त्यावर न बोललेलंच बरं. काही गोष्टींवर लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असले उपक्रम साजरे केले जातात.
राऊत पुढे म्हणाले की, त्यांना भारत - पाकिस्तान सामन्यावरून लक्ष विचलित करायचंय. आम्ही त्याकडं फार गांभिर्यांनं पाहत नाही. जेव्हा नग्न धिंड काढली जात होती त्यावेळी कुठे होते. तेव्हा तोंड उघडलं नाही. आता कशाला हे सर्व ढोंग करताय.
अबू धाबीत भाजपची सर्व मुलं सामना पाहायला जातील. जय शहा तिथं असतील... तुम्ही जर हिंदू असाल तर तोंड उघडा. साधा विरोध तरी करा. ते जे बाडगे जे शिवसेना म्हणून सरकारसोबत बसले आहेत ते काय करतायत. हा देशद्रोह आहे. ऑपरेशन सिंदूर संपलं नाही. महिलांचा आक्रोश संपला नाही आणि तुम्ही क्रिकेट खेळताय पाकिस्तानसोबत...?
दरम्यान, संजय राऊत यांनी भारत पाकिस्तान सामन्याबाबत आज उद्धव ठाकरे बोलणार आहेत असं देखील सांगितलं. ते म्हणाले, जिथं जिथं शिवसेना आहे तिथं तिथं मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवणार आहे. पंतप्रधानांना पहलगामची आठवण करून देणार आहे. देशात प्रखर राष्ट्रभक्त आहेत. क्रिकेटप्रेमी असले तरी ते सामना पाहणार नाहीत.
संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री युती, कॅबिनेट असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत की ते सहज सर्व प्रश्न सोडवू शकतात.