‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांना ‘संगीत नाटक अकादमी’

Ashok Saraf
Ashok Saraf

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून, नुकतेच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2022-23 वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचवेळी 'उस्ताद बिसमिल्ला खाँ युवा पुरस्कार' अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कला क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांमध्ये 2022 या वर्षासाठी शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना, तर 2023 साठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

गेली पन्नास वर्षे अंगभूत अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची करमणूक करणार्‍या अशोक सराफ यांना नुकतेच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले. पाठोपाठ संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने हा आनंद द्विगुणीत झाला आहे. राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कला कारकिर्दीला पुरस्कार रूपाने दाद मिळाली आहे.

ऋतुजाच्या अभिनयालाही दाद

'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या ऋतुजाने मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांतून रसिकांचे रंजन केले आहे. अपघातात दोन्ही हात गमावलेल्या जिद्दी तरुणीची भूमिका तिने 'अनन्या' या नाटकात केली होती. दोन्ही हात मागे बांधून दीड-दोन तास रंगभूमीवर तिने साकारलेल्या 'अनन्या'ला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या भूमिकेसाठी तिला 12 पुरस्कार मिळाले. शिवाय, एका भूमिकेसाठी वर्षभरात सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याचा विक्रमही तिच्या नावावर नोंदला गेला आहे.

इतर पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे

प्रसिद्ध ढोलकीवादक विजय चव्हाण, नंदिनी परब-गुजर (सुगम संगीत), सिद्धी उपाध्ये (अभिनय), महेश सातारकर (लोकनृत्य), प्रमिला सूर्यवंशी (लावणी), अनुजा झोकरकर (शास्त्रीय संगीत), सारंग कुलकर्णी (सरोद वादन), विनायक खेडेकर, नागेश आडारकर (अभंग संगीत).

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news