

Sanchar Saathi App Downloads :
नवी दिल्ली : संचार साथी ॲपवरून केंद्र सरकारवर विरोधी पक्षांकडून गंभीर आरोप होत असतानाच हे ॲप डाउनलोड होण्याच्या आकड्यांनी नवा विक्रम गाठला आहे. मंगळवारी (दि. २ डिसेंबर) हे अॅप डाउनलोडचे प्रमाण अचानक १० पट वाढून ६,००,००० झाले असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली.
सायबर सुरक्षा आणि मोबाइल सुरक्षेसाठी सरकारने विकसित केलेले संचार साथी अॅप सध्या चर्चेत आहे. मोबाइल फोनवर प्री-इंस्टॉलेशन अनिवार्य करण्याच्या आदेशाविरुद्ध निदर्शने सुरू असताना, अॅपचा डाउनलोड होण्याची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. सर्वसाधारणपणे दिवसाला हे ॲप सुमारे ६०,००० जण डाउनलोड करत होते. दूरसंचार विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सुमारे ६,००,००० लोकांनी हे अॅप डाउनलोड केले. याचा अर्थ एका दिवसात डाउनलोडमध्ये १० पट वाढ झाली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, आदेश जारी होण्यापूर्वी १५ दशलक्ष लोकांनी संचार साथी अॅप डाउनलोड केले होते. २८ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात सर्व मोबाइल कंपन्यांना सर्व नवीन आणि जुन्या फोनवर हे अॅप प्री-इंस्टॉल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२८ नोव्हेंबर रोजीच्या दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार, भारतात फोन विकणाऱ्या सर्व कंपन्यांनी त्यांच्या फोनवर संचार साथी अॅप प्री-इंस्टॉल करणे आवश्यक आहे. जुन्या डिव्हाइसेसना देखील सॉफ्टवेअर अपडेटद्वारे अॅप इन्स्टॉल करणे आवश्यक असेल. वापरकर्त्यांनी त्यांचे फोन पहिल्यांदा चालू केल्यावर ते अॅप दृश्यमान असायला याची खात्री कंपन्यांनी करावी. उत्पादक अॅप लपवून किंवा निष्क्रिय करून अनुपालनाचा दावा करू शकत नाहीत. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले की, वापरकर्ते इच्छित असल्यास अॅप अनइंस्टॉल करू शकतात. हे अंमलात आणण्यासाठी कंपन्यांना ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
संचार साथी हे पहिल्यांदा २०२३ मध्ये पोर्टल म्हणून लाँच करण्यात आले. याचा वापर फसवणूक करणाऱ्या कॉलची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या नावावर नोंदणीकृत सिमकार्ड ओळखण्यास मदत करण्यासाठी आणि चोरीला गेलेले फोन निष्क्रिय करण्यासाठी केला गेला आहे. हे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या डीएनडी अॅपसारखेच आहे आणि त्याच्या अॅप आवृत्तीमध्ये पोर्टलसारखीच सर्व वैशिष्ट्ये आहेत.