

लखनौ; वृत्तसंस्था : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये तरुणांना दरमहा ₹५,००० बेरोजगारी भत्ता देण्याची, वृद्ध महिलांना वार्षिक ₹४० हजार आणि १.५ लाख शिक्षामित्रांना शिक्षकांच्या बरोबरीने वेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, गरीब कुटुंबांना ₹१० लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देण्याचे, बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या दिशेने काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
अखिलेश यादव यांनी सांगितले की, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगले वेतन दिले जाईल, तसेच त्यांना नोकरीत कायम करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.
जाहीरनाम्यातील मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ लाख सरकारी नोकऱ्या मिळणार
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
२४ तासांत मोबदला देण्यासाठी ₹१५ हजार कोटींचा निधी
ग्रामीण विकास : गावांच्या पायाभूत सुविधांवर ₹१.५ लाख कोटी खर्च केले जातील.
समाजवादी कँटीन : महिला आणि गरिबांना पाच रुपयांत भोजन
कर्जमाफी : शेतकऱ्यांचे कर्ज तत्काळ माफ केले जाईल
रोजगार : ५ वर्षांत २५ लाख सरकारी नोकऱ्या आणि २ ते ३ कोटी तरुणांना रोजगार
शहरी रोजगार : शहरांमध्ये रोजगारासाठी ‘अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट’ (शहरी रोजगार हमी कायदा)
पेन्शन : वृद्ध महिला, मजूर, महिला कामगार आणि कारागिरांना वार्षिक ₹४० हजार पेन्शन