

नवी दिल्ली : कॅनडासोबतचे राजनैतिक संबंध तूर्तास सुधारतील अशी शक्यता वाटत नाही, असे स्पष्ट मत परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी व्यक्त केले. खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांनी केल्यानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एका वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, कॅनडाची भूमिका दुटप्पी आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांच्यासाठी दुटप्पी हा शब्दही सॉफ्ट आहे. भारतीय राजनैतिक अधिकार्यांवर कॅनडात दबाव टाकला जात आहे. भारताविरोधात कॅनडात सुरू असलेल्या कारस्थानाची माहिती घेण्यासही भारतीय अधिकार्यांना मज्जाव केला जात आहे. याउलट भारतात कॅनडाच्या राजनैतिक अधिकार्यांना भारतीय पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यास ते परराष्ट्र व्यवहार हस्तक्षेप केल्याचे ढोंग करीत आहेत. कॅनडाचे अधिकारी भारतात मुक्त संचार करीत आहेत. लष्करी कार्यालयांनाही ते भेटी देत आहेत. कॅनडामध्ये मात्र भारतीय अधिकार्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. भारतीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली कॅनडामध्ये भारतीय अधिकार्यांची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे कॅनडातून सहा भारतीय राजनैतिक अधिकार्यांना मायदेशी बोलावून कॅनडाच्या सहा अधिकार्यांची हकालपट्टी केल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.
निज्जर याच्या हत्येत भारतीय उच्चाधिकारी संजय वर्मा यांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. या पार्श्वभूमीवर वर्मा यांनी पंतप्रधान टुड्रो हे खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालत असल्याचा दावा केला.