

ठाणे : काँग्रेस हा देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पक्ष आहे. एकीकडे विकास साधायचा आणि दुसरीकडे काँग्रेसच्या काळातील खड्डे मुजवायचे अशी डबल मेहनत आमचे सरकार करत आहे. काँग्रेस आणि महाआघाडीने सत्तेत असताना केवळ विकासकामे रोखण्याचे काम केले. त्यामुळे काम करणारी महायुती आणि जनतेची कामे बंद पाडणारी काँग्रेस महाआघाडी असा हा संघर्ष आहे. तुमची कामे अडविणार्यांना रोखण्याचे काम आता तुम्हाला करायचे आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या या शत्रूंना सत्तेच्या बाहेर, शेकडो मैल दूर ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
उद्धव ठाकरे काँग्रेसचे नवे चेले
व्होट बँकेसाठी विचारांचे पतन
ठाण्यातून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग त्यांनी फुंकले. काँग्रेस पक्षावर भ्रष्ट आणि विकासविरोधी असल्याचा ठपका ठेवतानाच त्यांच्या संगतीत उद्धव ठाकरेंचे वैचारिक अधःपतन झाल्याची टीकाही मोदी यांनी केली. मुंबईतील भूमिगत मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन तसेच ठाण्यातील एकीकृत वर्तुळाकार मेट्रोचे भूमिपूजन, छेडानगर घाटकोपर ते आनंदनगर ठाणे उन्नत मार्ग, नैना शहरी पायाभूत विकासकामे आणि ठाणे महापालिकेच्या नव्या वास्तूच्या उभारणीचा प्रारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील कार्यक्रमात करण्यात आला. तब्बल 33 हजार कोटींच्या विकासकामांच्या लोकार्पणासोबतच राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कारही यावेळी करण्यात आला.
व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण, आदिती तटकरे, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट आदी उपस्थित होते. विकासकामांच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. 26 मिनिटांच्या आपल्या भाषणात मोदींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची जंत्री मांडली. त्याचवेळी काँग्रेस आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण कायम ठेवले.
आमच्या सरकारची प्रत्येक कृती ही विकसित भारताचे उद्दिष्टाला समर्पित आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राला त्यासाठी सिद्ध करण्याचे काम महायुती करत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या महाआघाडीने विकासकामे ठप्प करण्याचेच उद्योग आजवर केले. महाराष्ट्राच्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्याचा विचारही त्यांनी कधी केला नाही. मुंबई आणि ठाण्याची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आदी समस्यांमुळे देशाची ही आर्थिक राजधानी ठप्प पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी कधी यावर विचार केला नाही, असा आरोप मोदी यांनी केला.
आमच्या सरकारने त्यावर उत्तरे शोधली. आज मुंबई महानगरात 300 किलोमीटरच्या मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. कोस्टल रोड, अटल सेतूने अंतर कमी केले आहे. दुसरीकडे महाआघाडीने विकासकामात आडकाठी आणत ती ठप्प करण्याचेच काम केले. मुंबईतील मेट्रोचे काम हे त्याचे उदाहरण आहे. फडणवीसांच्या काळात मेट्रो 3 च्या कामाला सुरुवात होऊन त्याचे 60 टक्के कामही झाले. त्यानंतर महाआघाडीचे सरकार आले आणि त्यांनी अहंकारापोटी अडीच वर्षे मेट्रोचे काम लटकवले. त्यामुळे 14 हजार कोटींचा खर्च वाढला. हा करदात्यांच्या मेहनतीचा पैसा होता. काम पूर्ण करणारी महायुती आणि ती अडवणारी महाआघाडी असा हा सामना आहे. त्यांनी मेट्रो, बुलेट ट्रेन, अटल सेतू अशी विकासकामे रोखली. सोबतच सत्तेत असताना दुष्काळी भागातील पाण्याची कामेही रोखली. लोकांची तहान भागविणारे प्रकल्प रोखणार्यांना आता रोखायचे आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या शत्रूंना सत्तेच्या बाहेर, शेकडो मैलावरच रोखायचे असल्याचे आवाहन मोदींनी केले.
काँग्रेस म्हणजे देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पक्ष असल्याचा हल्लाबोल मोदींनी यावेळी केला. कोणत्याही काळात आणि कोणत्याही राज्यात काँग्रेसचे हे चरित्र बदलत नाही. काँग्रेस म्हणजे जनतेची लूट आणि फसवणुकीचे पॅकेज आहे. काँग्रेस सत्तेत असताना विकासाला का विरोध करते, याचे उत्तर आता उघड होत आहे, असे मोदी म्हणाले. समाजाचे तुकडे करणार्या काँग्रेसचे हे मनसुबे सफल होऊ देऊ नका, एकी कायम ठेवा, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.
काँग्रेसने वर्षानुवर्षे कुशासन आणि खोटारडेपणाच केला. महाराष्ट्रात तर आतापासूनच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मोफत तीन सिलिंडर दिले. हे काँग्रेसच्या पचनी पडत नाही. हे बंद पडण्याची संधी कधी मिळते, याची ते वाट पाहात आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राग काढत त्यांच्या सगळ्या योजनांना टाळे लावायचे आहे. बहिणींच्या हातात नको तर त्यांच्या दलालांच्या हातात सगळे पडावे, असा मविआचा डाव आहे. त्यामुळे बहिणींनी जरा जास्तच सावध राहावे, असे आवाहनही मोदींनी केले. नवीन व्होट बँक तयार करण्याच्या नादात विचारांचे अधःपतन झाले आहे. काँग्रेसची जी हुजुरी केली जात आहे. काँग्रेसचे भूत ज्याच्यात घुसते त्यांची अशीच अवस्था होते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.
महाविकास आघाडी म्हणजे लटकाना, अटकाना आणि भटकाना अशा वृत्तीची आहे. महायुतीच्या सर्व योजना बंद करण्याचीच यांची नीती आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे महाभ्रष्टाचारी आहे. आमच्या विकासकामांना खो घालण्याचे काम हे करतात.