

Russia Gasoline Export Ban: जागतिक राजकारणात आणि ऊर्जा क्षेत्रात सध्या मोठी खळबळ उडालेली आहे. रशियाने १ एप्रिलपासून आपल्या देशातून होणाऱ्या पेट्रोल निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाचा तुटवडा भासू नये आणि किमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी रशियाने हा निर्णय घेतला आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, रशियाच्या या निर्णयामुळे भारतातील पेट्रोलचे दर वाढतील का? याचे उत्तर 'नाही' असे आहे. भारत आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या गरजांसाठी रशियाकडून तयार इंधन (Gasoline) आयात करत नाही. भारत प्रामुख्याने रशियाकडून 'कच्चे तेल' (Crude Oil) खरेदी करतो. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८०% तेल आयात केले जाते, ज्यामध्ये रशियाचा वाटा सुमारे २०% आहे. रशियाने केवळ तयार पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घातली असून कच्चे तेल (Crude Oil) पुरवठा सुरूच राहणार आहे.
भारताकडे दररोज ५.६ दशलक्ष बॅरल तेल शुद्ध करण्याची प्रचंड क्षमता आहे. भारत कच्च्या तेलावर प्रक्रिया करून स्वतःचे पेट्रोल आणि डिझेल तयार करतो. इतकेच नाही तर भारत मोठ्या प्रमाणात शुद्ध केलेले इंधन जगाला निर्यात देखील करतो. त्यामुळे रशियाच्या पेट्रोल बंदीचा भारताच्या थेट पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
थेट परिणाम नसला तरी, जागतिक बाजारपेठेत इंधनाचा पुरवठा कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेले आहेत. जर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तर भारतीय कंपन्यांना तेल खरेदी करणे महाग पडू शकते, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम आगामी काळात इंधन दरांवर होऊ शकतो.