

Rohit Pawar meet Rahul Gandhi
नवी दिल्ली : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती राहुल गांधींना दिली. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी संसदेत आवाज उठवावा अशी विनंती रोहित पवार यांनी यावेळी केली.
या भेटीनंतर 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, रोहित पवार यांनी आज मला भेटून बारामती विमान अपघाताच्या चौकशीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र दिले.कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे पालन झालेले दिसत नाही आणि प्रकरणाचे गांभीर्य असूनही कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.या घटनेची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, राहुल गांधी यांनी मला अर्धा तास वेळ दिला. या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सीबीआय चौकशीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला नसल्याचे त्यांना सांगितले. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी या प्रकरणात पूर्ण मदत करतील, असे आश्वासन त्यांनी स्वतः दिले असल्याचे रोहित पवार म्हणाले. सोमवारी, मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवीन खुलासा करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.