

Delhi NCR Rain : दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी ( दि.२४ मे ) रात्री उशिरा अनेक भागात जोरदार वादळासह मुसळधार पाऊस पडला. शहरांमधील अनेक भागात पाणी साचले. अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मोती बाग, मिंटो रोड आणि विमानतळाच्या टर्मिनल १ जवळील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रात्री ११:३० ते पहाटे ४ दरम्यान ४९ विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला.
हवामान खात्याने दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा रेड अलर्ट आधीच जारी केला होता. रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. कॅन्ट परिसरात एक बस आणि एक कार पाण्यात बुडाली. अकबर रोडवर अनेक झाडे पडली, जी हटवण्याचे काम सुरू आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे १०० हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला. शनिवारी रात्री ११:३० ते रविवारी पहाटे ४:०० वाजेपर्यंत सुमारे ४९ उड्डाणे वळवण्यात आली, असे विमानतळ प्राधिकरणाने रविवारी सांगितले.दिल्ली विमानतळावरील उड्डाणांवरही परिणाम झाला. दिल्ली विमानतळाने जारी केलेल्या सूचनेमध्ये म्हटलं आहे की, शनिवारी रात्री खराब हवामानामुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती नियमितपणे तपासण्याचा आणि अपडेट्ससाठी एअरलाइन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती नियमितपणे तपासण्याचा आणि अपडेट्ससाठी एअरलाइन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे उष्णतेपासून आराम मिळेल. दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. राजधानीतील तापमान हळूहळू वाढेल. २६ आणि २८ मे रोजी ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. रात्रीचे तापमान देखील वाढेल आहे. २२ मे रोजी २१ अंशांवरून आठवड्याच्या अखेरीस ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल होते. दरम्यान, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.