

पुढारी ऑनलाईन डेस्क: RG Kar Case |आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या संजय रॉय यांना आज (दि.२०) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नसल्याचे स्पष्टपणे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ममता म्हणाल्या, "आम्ही सर्वांनी फाशीची शिक्षा मागितली होती पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे". आम्ही सुरुवातीपासूनच मृत्युदंडाची मागणी करत होतो, परंतु न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले नसते आणि आमच्या हाती असते तर फाशीची शिक्षा खूप आधीच झाली असती, असेही त्या म्हणाल्या.
यापूर्वी सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला होता की, "कोलकाता पोलिसांकडून तपासाची जबाबदारी जबरदस्तीने काढून घेण्यात आली. जर तपास कोलकाता पोलिसांच्या हाती असता तर निश्चितच या प्रकरणातील दोषी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती, असे त्या म्हणाल्या. मुर्शिदाबाद जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, आम्ही सर्वांनी आरोपीला मृत्युदंडाची मागणी केली होती, पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण आमच्याकडून जबरदस्तीने काढून घेण्यात आले. जर हे प्रकरण कोलकाता पोलिसांकडे राहिले असते तर आम्ही त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली असती याची खात्री ममता यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली.
मुख्यमंत्री म्हणाल्या, "या प्रकरणातील तपास कसा झाला हे आम्हाला माहिती नाही. राज्य पोलिसांनी तपासलेल्या अशा अनेक प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झाली. मी न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नाही". सरकारी आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर सियालदह न्यायालयाने संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.