पुढारी ऑनलाईन डेस्क : नालंदा केवळ नाव नाही, तर एक मंत्र आहे, एक ओळख आहे, एक घोषणा आहे. पुस्तके आगीत नष्ट होऊ शकतात, परंतु ज्ञान नष्ट करू शकत नाही, ते कायम राहील. येथे येणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी हे एक शुभ चिन्ह म्हणून पाहतो. नालंदाच्या पुनरुज्जीवनामुळे भारताच्या 'सुवर्णयुगाची' सुरुवात होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (दि. १९० करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मोदी पुढे म्हणाले की, मला आनंद आहे की, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर १० दिवसांत मला नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली आहे. नालंदा हे फक्त एक नाव नाही. ती एक ओळख आणि आदर आहे. नालंदा एक मूल्य आणि मंत्र आहे.
या उद्धाटन सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया उपस्थित होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, दारुसलाम, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम यासह एकूण १७ देशांचे विदेशी राजदूतही सहभागी झाले होते.
कॅम्पस दोन शैक्षणिक तुकड्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक ४० वर्गखोल्या आणि एकूण आसन क्षमता सुमारे १९०० आहे. यात दोन सभागृहे आहेत, प्रत्येकाची आसन क्षमता ३०० आहे. यात सुमारे ५५० लोकांची क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय केंद्र, २००० लोक बसू शकणारे सभागृह, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासारख्या अनेक अतिरिक्त सुविधा देखील आहेत.
हेही वाचा