

Reliance enters world's top 25 net worth club
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही भारतीय कंपनी निव्वळ संपत्तीच्या आधारे जगातील टॉप 25 सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये सामिल झाली आहे. रिलायन्स कंपनीने आंतरराष्ट्रीय ऊर्जा कंपन्यांना मागे टाकत 21व्या स्थानावर झेप घेतली आहे.
आता रिलायन्सदेखील मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट आणि सौदी अरामकोसारख्या दिग्गज कंपन्यांच्या रांगेत उभा राहिला आहे.
ब्लूमबर्गच्या डेटानुसार, FY25 मध्ये रिलायन्सची निव्वळ संपत्ती 118 अब्ज डॉलर (सुमारे 10 लाख कोटी रूपये) इतकी आहे. CNBC-TV18 च्या अहवालानुसार, RIL आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी अलीबाबा, AT&T आणि TotalEnergies यांच्याच्या अगदी मागे आहे.
रिलायन्सचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) जवळपास 140 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे Total SA आणि BP Plc सारख्या ऊर्जा कंपन्यांना रिलायन्सने मागे टाकले आहे. RIL चे बाजारमूल्य आज निफ्टी-50 तील 19 कंपन्यांच्या एकत्रित मूल्याइतके आहे.
किंवा 35 सार्वजनिक कंपन्या व बँकांच्या एकत्रित मूल्याइतकी रिलायन्सची मार्केट कॅप आहे. Nifty Small cap 250 इंडेक्समध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे मिळून जितके बाजारमुल्य आहे तितकी रिलायन्सची मार्केट कॅप झाली आहे.
शुक्रवारी, रिलायन्सच्या संचालक मंडळाने 25,000 कोटी रूपयांचा निधी उभारण्यास मान्यता दिली. हा निधी एका किंवा अधिक टप्प्यांमध्ये बाँड्सद्वारे उभारला जाईल. यासोबतच कंपनीने प्रतिशेअर 5.5 रु. लाभांश देखील घोषित केला आहे.
2025 मध्ये शेअरची उत्तम कामगिरी
रिलायन्सचा शेअर NSE वर 1300.40 या जवळपास स्थिर दराने बंद झाला. 2025 मध्ये आतापर्यंत रिलायन्सचा शेअर सुमारे 7 टक्के वाढला असून, याच कालावधीत निफ्टी 50 निर्देशांक फक्त 2 टक्क्यांहून कमी वाढला आहे.
गेल्या महिन्यात रिलायन्सच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ नोंदवली गेली होती. गेल्या तीन महिन्यांत 24 टक्के वाढ, आणि गेल्या वर्षभरात तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. या कामगिरीमुळे रिलायन्स निफ्टीच्या टॉप 10 शेअर्सपैकी एक मजबूत शेअर ठरला आहे.
रिलायन्सने आतापर्यंत 6 वेळा बोनस शेअर्स जारी केले आहेत.
1980 - 3:5 पहिला बोनस इश्यू
1983 - 6:10 दुसरा बोनस इश्यू
1997 - 1:1 तिसरा बोनस इश्यू
2009 - 1:1 चौथा बोनस इश्यू
2017 -1:1 पाचवा बोनस इश्यू
2024 - 1:1 सहावा बोनस इश्यू
बोनस इश्यूचा उद्देश शेअरधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक लाभ देणे आणि कंपनीच्या वाढीला प्रोत्साहन देणे असा असतो.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे नेतृत्व सध्या मुकेश अंबानी करत आहेत. ते कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. मुकेश हे रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. गेल्या काही वर्षांत मुकेश यांच्या मुले देखील रिलायन्सच्या विविध उद्योगात सक्रीय आहेत.
मुकेश यांचे पुत्र आकाश हे रिलायन्स जिओचे चेअरमन आहेत. मुलगी ईशा या रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालिका आहेत तर मुलगा अनंत रिलायन्सच्या नवीन ऊर्जा व्यवसायात सक्रिय आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना 8 मे 1973 रोजी झाली. ही कंपनी धीरूभाई अंबानी आणि त्यांचे चुलतभाऊ चंपकलाल दामानी यांनी सुरू केली होती.
1960 च्या दशकात ही कंपनी "Reliance Commercial Corporation" या नावाने कार्यरत होती आणि नंतर ती Reliance Industries या नावाने औपचारिकरित्या नोंदवली गेली.
आज रिलायन्स हा जगातील एक आघाडीचा उद्योगसमूह आहे. ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, तेल शुद्धीकरण, डिजिटल सेवा, रिटेल, टेलिकॉम, फायनान्स अशा विविध क्षेत्रांमध्ये हा उद्योगसमूह कार्यरत आहे.