

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रीपदाची धुरा महिला प्रतिनिधीकडे सोपविली आहे. 1998 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपाच्या सुषमा स्वराज होत्या. त्यानंतर २७ वर्षानंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सुत्रे रेखा गुप्ता हाती देण्यात आली आहेत. भाजपा विधिमंडळ दलाच्या बैठकीत बुधवारी (दि.१९) त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत. त्याच्या आधी शीला दीक्षीत, सुषमा स्वराज, आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या महिला मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळली आहे.
दिल्लीच्या भाजपाच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेल्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागातील नंदगड गावातील त्या रहिवाशी असून त्यांनी मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदीही काम केले आहे. त्या दिल्ली विद्यापीठाच्या सचिव आणि प्राचार्यही राहिल्या आहेत. दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी काँग्रेस नेत्या शीला दीक्षित, भाजप नेत्या सुषमा स्वराज तर आप नेत्या अतीशी या महिलांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. या तिन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक १५ वर्षांचा कार्यकाळ शीला दीक्षित यांचा राहिला. सुषमा स्वराज यांचा कार्यकाळ केवळ ५२ दिवसांचा तर अतिशी यांचा कार्यकाळ ४ महिने आणि काही दिवसांचा राहिला. शीला दीक्षित, सुषमा स्वराज, अतिशी यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत.