

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीमध्ये भाजपने तब्बल 27 वर्षांनंतर सत्ता मिळवली. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण होती. अखेर नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव आता समोर आले आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये प्रवेश वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. रेखा गुप्ता या शालीमार बाग विधानसभा क्षेत्रातून प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपा विधिमंडळ दलाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील; त्यांच्या आधी आतिशी मार्लेना, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज यांनी हे पद भूषवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, दिल्लीमध्ये भाजपाच्या नवीन सरकारकडून नागरिकांना नवीन अपेक्षा आणि विकासाच्या दिशा मिळण्याची आशा आहे.
भाजपने दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली आहे. रेखा गुप्ता दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री होतील. त्या गुरुवारी रामलीला मैदानावर एका भव्य समारंभात मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. 26 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होत आहे.
दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत वेगवेगळ्या नावांची चर्चा सतत सुरू होती. परंतु भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. दिल्ली भाजप कार्यालयात 48 आमदारांनी विधानसभेतील सभागृह नेतेपदाची निवड केली, जे गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
नेते म्हणून निवड झाल्यानंतर, आता भावी मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची राज निवास येथे भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.