

नवी दिल्ली : पश्चिम आशियात युद्ध परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार इस्त्रायलमध्ये १५ हजार भारतीय कामगारांची भरती करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन सरकारवर हल्लाबोल केला. पश्चिम आशियातील युद्धादरम्यान मोदी सरकार राष्ट्रीय कौशल्य विकास सहयोग योजनेनुसार इस्रायलमध्ये सुमारे १५ हजार भारतीय कामगारांची भरती करत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. याआधीही रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान, देशातील तरुणांना संशयास्पद एजंटांकडून फसवले गेले आणि अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले, असल्याचा दावाही खर्गे यांनी केला.
मोदी सरकारच्या युवकविरोधी धोरणांमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचा हा परिणाम आहे, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. अकुशल, अर्धकुशल आणि सुशिक्षित तरुण युद्धग्रस्त भागात तथाकथित उच्च वेतनावर काम करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यास तयार असतात हे वास्तव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नोकऱ्यांबाबतचे मोठे दावे आपले अपयश लपवू शकत नाहीत, हे यावरून दिसून येते. हरियाणातील तरुणांना या युद्धक्षेत्रात नोकरीच्या शोधात जावे लागत आहे. उद्या मतदानावेळी भाजपला चोख प्रत्युत्तर मिळेल, असे ते म्हणाले. हरियाणातील सर्व ९० जागांसाठी शनिवारी मतदान होणार असून, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षांनी हा हल्लाबोल केला आहे.
भाजपचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, ४ ते ५ वर्षांत देशातील बेरोजगारीचा दर कमी झाला आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. देश झपाट्याने जगातील ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्यांनी खर्गे यांना काही प्रश्नही विचारले. तुमच्या सरकारचे मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या झारखंडमध्ये तुम्ही बेरोजगारी संपवली का? ज्या कर्नाटकात तुमचे मुख्यमंत्री भ्रष्टाचार आणि जमीन घोटाळ्याच्या आरोपांनी घेरले आहेत, तिथे तुम्ही बेरोजगारी संपवली का? असे सवाल वल्लभ यांनी खर्गे यांना केले.