सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस कोसळत असून शेतकरी शेती कामात मग्न आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1101 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच 15 हजार हेक्टर क्षेत्रावर भातरोपांची लावणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या या अवकाळी पावसाचा फायदा घेत शेतकर्यांनी मे महिन्यातच भात पेरणी केली होती. त्यामुळे भात लावणी कामासही लवकर सुरुवात झाली. कृषी विभागाच्या सर्व्हेनुसार या वर्षी जिल्ह्यात सुमारे 56 हजार हेक्टरवर भात शेती केली जाणार आहे. जून महिन्यात यातील 15 हजार हेक्टरवर भात रोपे लावणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकार्यांनी दिली. पाऊस व्यवस्थित झाल्यास उर्वरित 41 हजार हेक्टरवरील लावणी 15 ते 20 जुलैपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
जिल्ह्यात अजूनही पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. मात्र, काही शेतकरी या पारंपरिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देत आहेत. कृषी विभागाच्या पुढाकाराने अनेक शेतकरी 'श्री' पद्धतीच्या भात लागवडीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा आहे. त्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरण करण्यास मर्यादा येतात. जिल्ह्यातील आठ पैकी तीन तालुके समुद्रकिनारी पट्ट्यात आणि चार तालुके सह्याद्री पट्ट्यात येतात. सह्याद्री पट्ट्यामध्ये वन्यप्राण्यांचा मोठा त्रास होत असल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक रहात आहे.
जिल्ह्यामध्ये यावर्षी प्रामुख्याने मसुरी, जया, सुवर्णा, रत्नागिरी 24, कोमल, सुरुची, शुभांगी, वाडा कोलम, आजरा घनसाळ, चिंटू, दप्तरी अशा सुधारीत व संकरीत वाणांची भात पेरणी झाली आहे. गत वर्षा पासून शासकीय भात खरेदी करताना शेतकर्यांना हमीभाव अधिक बोनस मिळत असल्याने शेतकरी पुन्ि भात उत्पादनाकडे वळताना दिसत आहेत. अनेक शेतकर्यांनी आता व्यावसायिक दृष्ट्या भातशेती करण्यास सुरुवात केली आहे. भातरोपे लावणीसाठी योग्य पाऊस आवश्यक असतो. मात्र गेल्या चार- पाच दिवसापासून पाऊस गायब झाल्याने लावणीचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र आहे.