

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येत्या १ ऑक्टोबर २०२६ पासून, बँकांना ३ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या मुदत ठेवींचे (बल्क फिक्स्ड डिपॉझिट) दर ठरवण्याच्या आणि ते जाहीर करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागणार आहे. आता बँकांना प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांच्या संकेतस्थळावर व्याज दर प्रसिद्ध करावे लागतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) नवीन नियम ऑक्टोबरपासून लागू होत आहेत. एकाच दिवशी स्वीकारल्या जाणाऱ्या समान ठेवींसाठी त्यांना त्यांच्या सर्व शाखांमध्ये एकसमान दर द्यावे लागतील. ‘आरबीआय’च्या ३० जुलै २०२६ रोजीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमुळे बदल होत आहेत. साधारणपणे तीन कोटी रुपयांपासून मुदत ठेवी ठेवणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
सामान्य एफडी गुंतवणूकदारांसाठी, मुदत ठेव करण्याच्या पद्धतीत बदल झालेला नाही. या नवीन तरतुदी प्रामुख्याने मोठ्या ठेवींसाठी आणि बँका ज्या प्रकारे ठेवींचे दर जाहीर करतात, त्या पद्धतीसाठी आहेत.
मोठ्या गुंतवणूकदारांनी काय करावे?
ऑक्टोबरपासून, मुदत ठेवीमध्ये ३ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी ठेव ठेवण्याच्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास प्रकाशित झालेला ‘बल्क डिपॉझिट रेट’ पाहावा. केवळ शाखा किंवा रिलेशनशिप मॅनेजरने तोंडी सांगितलेल्या दरावर अवलंबून राहू नये. ठेवीचा प्रकार, ठेवीचे स्वरूप आणि त्यावरील तरलतेचे निकष यानुसार व्याज दर बदलू शकतो. एफडी ठेवताना प्रकाशित दराची एक प्रत किंवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवा.