नवी दिल्ली : देशातील प्रमुख स्मॉल फायनान्स बँकांमध्ये मुदत ठेव (एफडी) करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता स्मॉल फायनान्स बँकांच्या ग्राहकांना व्याज दराची संपूर्ण माहिती आधी मिळेल. हे नवीन नियम आणि नियमन १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. देशभरातील स्मॉल फायनान्स बँकांत एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसाठी प्रणालीमध्ये अधिक स्पष्टता, पारदर्शकता आणि निष्पक्षता आणणे हा मुख्य उद्देश यामागे असल्याचे सांगण्यात आले.
जाणून घ्या नियमांतील पाच प्रमुख बदल
आता बँकांना त्यांचे ठेव व्याज दर वेळापत्रक आधीच प्रकाशित करावे लागेल. नियमित आणि मोठ्या ठेवींवरील व्याज बँकेच्या वेबसाईटवर दर्शविलेल्या दरांनुसारच असावे. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या बँकांच्या एफडी दरांची तुलना करणे सोपे होईल.
बल्क डिपॉझिटसाठी, स्मॉल फायनान्स बँकांना प्रत्येक व्यावसायिक दिवशी (म्हणजे कामकाजाच्या दिवशी) स. १० वा. त्यांच्या वेबसाईटवर लागू होणारे व्याज दर जारी करावे लागतील. यामध्ये १० मिनिटांचा ग्रेस पीरियड दिला जाईल. म्हणजेच बँका सकाळी १०१.१० पर्यंत त्यांचे दर अपडेट करू शकतील. शेड्यूल्ड कमर्शियल बँका आणि स्मॉल फायनान्स बँकांसाठी ३ कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या सिंगल रुपया टर्म डिपॉझिटला बल्क डिपॉझिट मानले जाते.
बँकांच्या सर्व शाखांवर एकसमान व्याज दर मिळतील. म्हणजेच बँक एकाच तारखेला स्वीकारलेल्या समान रकमेच्या ठेवींवर वेगवेगळे दर देऊ शकणार नाहीत. यामुळे ग्राहकांसोबत कोणत्याही शाखेच्या किंवा प्रोफाईलच्या आधारावर भेदभाव होणार नाही आणि सर्वांना समान अधिकार मिळेल.
समानतेचा नियम सामान्य किंवा नियमित ठेवींना लागू राहील. तथापि, स्मॉल फायनान्स बँक बल्क ठेवींवर वेगवेगळ्या व्याज दरांची ऑफर देऊ शकतात. हे नियम बँकेने आधीच स्पष्ट करावे लागतील.
व्याज दरांमधील हा फरक आरबीआयच्या नियामक चौकटीनुसार ठेवींची स्थिरता आणि तरलता आवश्यकतांसारख्या घटकांवर आधारित असू शकतो. ही सवलत अनिवासी ग्राहकांकडून मिळणाऱ्या बल्क ठेवींनादेखील लागू होईल.