पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी (दि.२६) पहाटे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखे काहीही नाही. आम्ही लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत औपचारिक निवेदन जारी करु, असे आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
"भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ॲसिडिटीचा त्रास झाल्याने चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक आहे आणि पुढील २ ते ३ तासांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. काळजी करण्याचे कारण नाही," असे आरबीआय प्रवक्तानी सांगितले.
६६ वर्षीय शक्तीकांत दास कार्यालयीन कामांनिमित्त चेन्नईत आहेत. यादरम्यान त्यांना तब्येतीचा त्रास जाणवला.