Jackfruit Farming : मोदींच्या भेटीसाठी रत्नागिरीच्या तरुण शेतकऱ्याचा ‘फणसाचा खजिना’!

शरद पवारांनी घडवली भेट; फणस, पावडर, गरे अन् सालीपासून बनविलेली बॅग-पासपोर्ट होल्डर पंतप्रधानांना भेट
Jackfruit Farming
मोदींच्या भेटीसाठी रत्नागिरीच्या तरुण शेतकऱ्याचा ‘फणसाचा खजिना’!
Published on
Updated on

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाहानंतरच्या स्वागत समारंभाची लगबग सुरू असतानाच रत्नागिरीच्या फणस शेतीची चर्चा राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. शरद पवार यांनी रत्नागिरीतील प्रयोगशील तरुण शेतकरी मिथिलेश देसाई यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणली. यावेळी देसाई यांनी पंतप्रधानांना फणस, फणसापासून तयार केलेली पावडर, गरे तसेच सालीपासून तयार केलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डर भेट दिले.

देसाई यांनी दिलेल्या उत्पादनांची पंतप्रधान मोदी यांनी आस्थेने माहिती घेतली. त्यांनी देसाई यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. फणसाला राष्ट्रीय पातळीवर अधिक प्रोत्साहन मिळावे आणि एखादे वर्ष ‘फणस वर्ष’ म्हणून साजरे करण्यात यावे, अशी विनंतीही देसाई यांनी पंतप्रधानांकडे केली. त्याला मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे देसाई यांनी सांगितले. स्वागत समारंभाच्या निमित्ताने झालेली ही अनपेक्षित भेट उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

फणसासाठी नोकरी सोडून शेतीत उतरले

मिथिलेश देसाई हे रत्नागिरी हातखंबा येथील तरुण शेतकरी आहेत. हातखंबा व लांजातील झापडे येथे त्यांची फणसाची शेती आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचा मार्ग न स्वीकारता त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. फणसाला संशोधन, प्रक्रिया आणि बाजारपेठेची जोड देण्याचे काम त्यांनी सुरू केले. देसाई यांच्या वडिलांनी १९७२ पासून व्यावसायिक पद्धतीने फणसाची शेती व विक्री सुरू केली. हातखंबा येथे अवघ्या ५० पैशांपासून रस्त्यावर फणस विकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज संशोधन व प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचला आहे. देसाई यांच्या २८ एकरांच्या शेतीत जगभरातील १२८ पैकी ८८ फणसांच्या जातींचे संकलन व लागवड करण्यात आली आहे. या विविध जातींवर पुढील संशोधनही सुरू आहे.

‘फणस म्हणजे कल्पवृक्ष’

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर ‘पुढारी’शी संवाद साधताना मिथिलेश देसाई म्हणाले, ‘फणस हे केवळ कोकणातील पारंपरिक फळ नसून भविष्यात भारतीय कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याची क्षमता असलेले पीक आहे. फणसाच्या सालीपासून गरे, पाने आणि बियांपर्यंत जवळपास प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. त्यामुळे आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो.’फणसाच्या पानांवरही विविध संशोधन सुरू असून, त्यातील औषधी गुणधर्मांचा अभ्यास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांना दिला ‘फणसाचा खजिना’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देसाई यांनी फणसासह विविध मूल्यवर्धित उत्पादने भेट दिली. त्यामध्ये मिल्कशेक व आईस्क्रीमसाठी वापरता येणारी कच्च्या गऱ्यांची पावडर, फणसाच्या आठळीची पावडर आणि फणसाचे गरे यांचा समावेश होता. याशिवाय फणसाच्या सालीपासून तयार केलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डरही त्यांनी भेट दिले. फणसाचा केवळ गरच नव्हे, तर साल, पाने आणि बियांचाही व्यावसायिक उपयोग होऊ शकतो, हे या उत्पादनांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे देसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news