

Banded Krait Snake
कोलकाता : भारतातील एक दुर्मिळ आणि अतिविषारी सापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा पश्चिम बंगालच्या घनदाट जंगलातून जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला 'बँडेड क्रेट' म्हणजेच 'पट्टेरी मण्यार' रात्रीच्या अंधारात पाण्यात पोहताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
भारतीय वन सेवेतील (IFS) अधिकारी प्रवीण कासवान हे बंगालच्या जंगलात आपली नियमित रात्रीची गस्त घालत असताना त्यांना हा दुर्मिळ साप दिसला. टॉर्चच्या प्रकाशात या सापाचे पिवळे आणि काळे पट्टे अतिशय आकर्षक दिसत होते. कासवान यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या सापाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितले आहे.
पट्टेरी मण्यार हा भारतात आढळणाऱ्या सर्वात अनोख्या सापांपैकी एक आहे. हा साप खूप दुर्मिळ असून त्याच्या शरीरावरील पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या पट्ट्यांमुळे तो अतिशय सुंदर दिसतो. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून निसर्गाने त्याला हे मोहक रूप दिले आहे. मात्र, हा साप जितका देखणा आहे, तितकाच तो अत्यंत धोकादायक आहे.
तज्ज्ञांच्या मते, पट्टेरी मण्यारचे विष थेट मानवी चेतासंस्थेवर हल्ला करते. जर या सापाने दंश केला आणि त्यावर त्वरित उपचार मिळाले नाहीत, तर ते जीवावर बेतू शकते. मात्र, निसर्गाने या सापाला अतिशय लाजाळू स्वभाव दिला आहे. हा साप निशाचर असल्याने दिवसा बिळात किंवा पालापाचोळ्यात लपून राहतो आणि विनाकारण हल्ला करत नाही.