तिसरी विमानवाहू नौका लवकरच : राजनाथ सिंह

तिसरी विमानवाहू नौका लवकरच : राजनाथ सिंह

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यावर सरकारचा भर असून, सध्या नौदलाच्या ताफ्यात दोन विमानवाहू नौका आहेत, लवकरच तिसर्‍या विमानवाहू नौकेची बांधणी सुरू होणार आहे, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले की, बदलती भूराजकीय स्थिती ध्यानात घेऊन भारत आपले नौदल मजबूत बनवत आहे. प्रारंभी दोन विमानवाहू नौका ताफ्यात ठेवण्याची देशाची भूमिका होती. दोन नौका ताफ्यात आल्या आहेत; पण भारत आता तिसरी नौकाही तयार करणार आहे. लवकरच त्या नौकेची बांधणी सुरू होईल. एवढ्यावरच भारत थांबणार नसून, पाच किंवा सहा नौकांची निर्मिती केली जाणार आहे. भारताने विमानवाहू नौकांच्या निर्मितीत रशियाचे सहकार्य घेतले असून, अत्याधुनिक आणि अधिक क्षमतेच्या विमानवाहू नौका हे भारताचे लक्ष्य असल्याचे सिंह म्हणाले.

सागरी शक्तीची स्पर्धा

भारत आणि चीन यांच्यात सागरी शक्तीबाबत स्पर्धा आहे. चीनच्या नौदल ताफ्यात लियाओनिंग आणि शँडाँग या दोन विमानवाहू नौका आहेत. गेल्याच आठवड्यात चीनने त्यांच्या नवनिर्मित फुजीआन या आधुनिक विमानवाहू नौकेची चाचणी घेतली आहे. ही 80 हजार टन वजनाची युद्धनौका अमेरिका वगळता इतर सर्व देशांच्या युद्धनौकांपेक्षा मोठी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news