

पुढारी ऑनलाईन डेस्क : Naresh Meena | राजस्थान पोटनिवडणुकीत देवळी-उनियारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांना कानशिलात लगावल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. बुधवारी रात्री सामरावता गावात नरेश मीणा यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मीणा यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. तसेच सुमारे ९० वाहनांची जाळपोळ केली. यानंतर सामरावता गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी रात्रीपासून पोलिस नरेश मीणाला अटक करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते फरार झाले. गुरुवारी दुपारी पोलिसांना अखेर यश आले असून नरेश मीणा यांना अटक करण्यात आली आहे.
राजस्थान काँग्रेस युनिटने देवली उनियारा मतदारसंघातून आपला अधिकृत उमेदवार उभा केला होता. त्यानंतरही नरेश मीणा यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली. यानंतर काँग्रेसने नरेश मीणा यांना निलंबित केले. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नरेश मीणा यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
अमित चौधरी हे राजस्थान प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. ते सध्या टोंक जिल्ह्यातील मालपुरा येथे एसडीएम आहेत. अमित चौधरी हे राजस्थानमधील २०१९ बॅचचे RSS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म १४ मे १९९२ रोजी झाला. अमित चौधरी हे मूळचे अलवर येथील आहेत. मालपुरा टोंकमध्ये एसडीएम होण्यापूर्वी झालावाडच्या मनोहरपुरा पोलिस ठाणे, डुंगरपूर चिकली, हिंदोली बुंदी, अस्वर झालावार आणि नागौरमध्ये सेवा बजावली आहे.
देवळी- उनियारा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. यादरम्यान अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी निवडणूक ड्युटीवर तैनात अधिकारी अमित चौधरी यांना कानाखाली मारली. यानंतर राजस्थान प्रशासकीय सेवा अधिकारी संघटनेने नरेश मीणा यांच्या अटकेची मागणी केली. मीना यांनी मात्र प्रशासनाला आव्हान देत गावात आंदोलन केले. प्रशासनावर दबाव टाकता यावा म्हणून त्यांनी आपल्या समर्थकांना सामरावता गावात मोठ्या संख्येने लाठ्या-काठ्या घेऊन जमण्यास सांगितले. नरेश मीणा यांच्या संतप्त समर्थकांना आवर घालण्यासाठी पाच पोलिस ठाण्यांमधून पोलिसांना पाचारण करावे लागले. मीणा समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या हिंसाचारानंतर नरेश मीणा यांच्यासह ६० हून अधिक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजस्थान पोटनिवडणुकीत देवळी-उनियारा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना कानशिलात लगावल्याने संतप्त झालेल्या ९२७ आरएएस अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांच्यासह १० हजार पटवारी, १३ हजार महसूल कर्मचारी, ६०० तहसीलदार, १५ हजार ग्रामसेवक, असे सुमारे ३५ ते ४० हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. राजस्थान प्रशासकीय सेवेच्या (आरएएस) अधिकाऱ्यांनीही अनेक जिल्ह्यांमध्ये निवेदन दिले. जोधपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी साडेनऊ वाजता अधिकारी जमले. आरएएस असोसिएशनचे जोधपूर अध्यक्ष अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त प्रतिभा सिंह यांना निवेदन देण्यात आले. नरेश मीणा यांना तात्काळ अटक करण्याची तसेच निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अधिकाऱ्यांना केली आहे.