

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : ‘काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यात टेक्सासमध्ये इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांची मुलाखती सुरू होती. या दरम्यान पत्रकाराशी गैरवर्तन करण्यात आले आणि तो व्हिडिओ राहुल गांधींच्या टीमने हटवला’ असे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टने म्हटले असुन या गोष्टीचा निषेध केला आहे.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टने या संदर्भात एक पत्रक काढले असुन यामध्ये सांगितले की, ‘पत्रकार रोहित शर्मा यांनी सॅम पित्रोदा यांना बांगलादेशमध्ये मारल्या जाणाऱ्या हिंदूंबाबत राहुल गांधी अमेरिकन खासदारांशी चर्चा करणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर राहुल गांधींच्या टीमने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांचा फोन हिसकावून व्हिडिओ डिलीट केला. तसेच संबंधित पत्रकाराला जबरदस्तीने हॉटेलच्या खोलीत ३० मिनिटे डांबून ठेवण्यात आले.’ नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट इंडियाचे अध्यक्ष रास बिहारी म्हणाले की, ‘एकीकडे राहुल गांधींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात भारतातील मीडिया स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आणि दुसरीकडे त्यांच्या टीमच्या सदस्यांनी भारतीय पत्रकाराने प्रश्न विचारले म्हणून त्याच्याशी गैरवर्तन केले आणि जबरदस्तीने फोनमधून व्हिडिओ हटवला.’
रास बिहारी म्हणाले की, ‘सॅम पित्रोदा यांच्या मुलाखतीदरम्यान मुलाखत थांबवण्यासाठी राहुल गांधींच्या टीममधील सदस्यांनी गोंधळ घातला. तसेच राहुल गांधींनी यापूर्वीही पत्रकारांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे सर्व प्रवक्तेही हेच करत असतात. यापुर्वीही काँग्रेसने पत्रकारांना त्यांची जात विचारून अपमानित केले आहे,’ असेही रास बिहारी म्हणाले.