कोल्हापूर : शाळांमधील विद्यार्थिनींशी गैरप्रकार करण्याचे प्रमाण वाढत असून, त्याला आळा घालण्यासाठी गैरवर्तन करणार्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचार्याला तत्काळ थेट बडतर्फ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कारवाईसाठी लागणारा कालावधी कमी करण्याकरिता कायदेशीर बाबी तपासून नवीन नियमावली तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिल्या आहेत. या संदर्भातील अहवाल महिनाभरात पाठविण्याबाबतही मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सांगण्यात आले आहे.
अलीकडे विद्यार्थिनींशी गैरप्रकार करण्याच्या घटना शाळांमध्ये वाढत आहेत; परंतु त्यांची गांभीर्याने दखल शाळा व्यवस्थापन घेत नाही. उलट शाळेची बदनामी होईल या भीतीने याची चर्चा होऊ नये यासाठी प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पालकांच्या मनःस्थितीचा विचार केला जात नाही. याचा उद्रेक कधी ना कधी होतो, हे बदलापूर येथील घटनेवरून दिसून आले आहे. याची सरकारला दखल घ्यावी लागली. असे प्रकार करणार्यांना जरब बसविण्यासाठी शासनाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणार्या शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचार्यांना तत्काळ बडतर्फ करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी बडतर्फ करण्याच्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदी तपासून त्वरित नियमावली एस.ओ.पी. तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता तक्रार पेटी बसवावी. ज्या ठिकाणी तक्रार पेटी असणार नाही, त्या शाळांवर कारवाई करावी, पॉक्सो अधिनियमांतर्गत दाखल होणार्या न्यायालयीन प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेण्यासंदर्भात न्यायिक अधिकारी (न्यायाधीश) व शासकीय अभियोक्ता यांचा अंतर्भाव असलेल्या समितीची स्थापना करावी, असेही सीईओंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरक्षेच्या द़ृष्टीने देखरेख यंत्रणा, दक्षता पथक तसेच कार्यपद्धती ठरवण्याच्या द़ृष्टीने समिती स्थापन करावी, तसेच देखरेख यंत्रणेमधील अधिकार्यांकडून शाळांची नियमित तपासणी व्हावी, अशा सूचनाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
शाळांमध्ये कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती सध्या मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. अशा कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यापूर्वी संबंधित कर्मचार्यांची पोलिस ठाण्यामार्फत सखोल चौकशी करावी, त्यानंतरच त्याची नेमणूक करावयाची आहे.