

Rahul Gandhi
अररिया : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एका लहान मुलामधील संवाद चांगलाच व्हायरल होत आहे. अररिया येथील जनसंपर्क अभियानावेळी हा मजेशीर आणि भावनिक प्रसंग घडला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी काँग्रेस उमेदवारांचा अररिया येथे प्रचार करत होते. प्रचाराच्या धामधुमीत असताना, एका लहान मुलाने राहुल गांधींना थांबवले. व्हिडिओमध्ये, राहुल गांधी त्या हसऱ्या मुलाजवळ थांबतात, त्याचा हात धरतात आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. हा मुलगा अर्श नवाझ नावाचा स्थानिक यूट्यूबर असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधींशी झालेल्या या संवादानंतर अर्शने सांगितले की, त्याने उत्सुकतेने “तुम्ही लग्न कधी करणार?” असा प्रश्न विचारला.
लहानग्याच्या या अनपेक्षित प्रश्नावर राहुल गांधींनी स्मितहास्य केले आणि अत्यंत सहजपणे उत्तर दिले. ते म्हणाले, “जेव्हा माझे काम पूर्ण होईल, तेव्हा मी लग्न करेन.”
प्रचारातील व्यस्ततेतही राहुल गांधींनी दिलेल्या या हलक्या-फुलक्या उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा संवाद आता निवडणूक चर्चेतील एक 'व्हायरल मोमेंट' बनला आहे. अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. याच संभाषणादरम्यान राहुल गांधींनी अर्श नवाझ याला 'वोट चोरी' प्रकरणावर नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दलही सांगितले.