

Pahalgam Terror Attack
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी शुक्रवारी (दि.25) काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते अनंतनाग येथे पहलगाम हल्ल्यातील जखमींची भेट घेणार आहेत आणि त्यांची विचारपूस करणार आहेत. परदेशातून परतल्यानंतर राहुल गांधी गुरुवारी काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर शुक्रवारी काश्मीर दौरा करणार आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारसह प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष देखील सक्रिय आहे. हल्ला झाल्यानंतर तातडीने काँग्रेसने पक्षाच्या कार्यसमितीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये हल्ल्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी बुधवारी काश्मीर दौरा केला होता आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली होती.