नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्ली एम्समधील सुविधांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांना पत्र लिहून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी चांगल्या सुविधांची मागणी केली.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, “देशभरातून दिल्ली एम्समध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अलिकडेच मी पाहिले की या लोकांना कडाक्याच्या थंडीत मेट्रो स्टेशनखाली झोपावे लागते, जिथे पिण्याच्या पाण्याची किंवा शौचालयाची व्यवस्था नाही. तिथे कचऱ्याचे ढीगही पडलेले आहेत."
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, “दिल्ली एम्समध्ये इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण येतात म्हणजे ते जिथे राहतात तिथे त्यांना परवडणाऱ्या आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. मला आशा आहे की माझ्या पत्राची दखल घेऊन दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्री या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलतील. येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार सार्वजनिक आरोग्य सेवा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलेल आणि त्यासाठी आवश्यक असलेली संसाधने वाढवेल अशी आशा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
काही दिवसांपपूर्वी राहुल गांधींनी एम्स आणि आसपासच्या परिसरांना भेट दिली होती. या भेटीचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला. “देशभरातील गरीब रुग्ण आणि त्यांच्या कटुंबियांना एम्सच्या बाहेर थंडी, घाण आणि उपासमारीत झोपावे लागते. राहायला सुविधा, खायला अन्न, शौचालये आणि पिण्याचे पाणी नाही. मोठे मोठे दावे करणारे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार या समस्येकडे का डोळेझाक करत आहे?”, असा प्रश्न राहुल गांधींनी तेव्हाही विचारला होता.