

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर निशाणा साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, राम मंदिर बांधल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले हे त्यांचे विधान देशद्रोहासारखे आहे. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. हे भागवत यांचे विधान प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे. जर भागवत यांनी हे इतर कोणत्याही देशात बोलले असते तर त्यांना अटक झाली असती, असेही राहुल गांधी म्हणाले.
नवीन पक्ष मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पक्ष नेत्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल आणि संविधानाबद्दल दर 2-3 दिवसांनी देशाला सांगण्याची हिंमत मोहन भागवत यांच्यात आहे. त्यांचे काय मत आहे?" काल त्यांनी जे म्हटले ते देशद्रोहासारखे आहे, कारण त्यात म्हटले आहे की संविधान अवैध आहे. ब्रिटिशांविरुद्धची लढाई अवैध होती.
ते पुढे म्हणाले, “त्यांच्यात (भागवत) हे जाहीरपणे सांगण्याची हिंमत आहे, जर हे इतर कोणत्याही देशात घडले असते तर त्यांना अटक केली असती आणि त्यांच्यावर खटला दाखल केला असता. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे म्हणजे प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. हे बोल ऐकणे थांबवण्याची वेळ आली आहे. कारण या लोकांना वाटते की ते फक्त पुनरावृत्ती करत आणि ओरडत राहू शकतात."
याआधी, दोन दिवसांपूर्वी सोमवारी, सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करावी. कारण अनेक शतकांपासून शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देणाऱ्या देशाला खऱ्या स्वातंत्र्याची गरज होती. ते या दिवशी प्राप्त झाले. पक्षाच्या नवीन मुख्यालयात देशात दोन विचारसरणींमधील सुरू असलेल्या लढाईबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, येथे दोन विचारसरणींमधील लढाई सुरू आहे. एका बाजूला आपला विचार आहे, जो संविधानाचा विचार आहे. दुसऱ्या बाजूला संघाचा विचार आहे जो त्याच्या विरुद्ध आहे.