

नवी दिल्ली: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले होते. यावेळी राहुल गांधींनी उपस्थित सर्व नेत्यांना मतदान हेराफेरी संदर्भात एक सादरीकरण दाखवले. या सादरीकरणानंतर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण विषयांच्या संदर्भात चर्चा झाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यापासून राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत. राज्यात मतदानाची वाढलेली टक्केवारी, महाराष्ट्रात वाढलेले मतदार आणि निवडणूक आयोगाची भूमिका यावरून महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनीही आरोप केले होते. त्यानंतर सातत्याने मतचोरीचा मुद्दा चर्चेत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते. यासह उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कोण कोणाशी युती करेल, हे अद्या स्पष्ट नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या जोरदार चर्चा आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेस त्यांच्यासोबत असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.