

Rahul Gandhi on Maharashtra Election rigging votes BJP Manipulation of electoral system
नवी दिल्ली ः लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूकांवरून टीकास्त्र डागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक भाजपने मतांचा घोळ करून जिंकल्या, असा पुनरूच्चार राहुल गांधींनी केला आहे.
मतांमध्ये घोळ कसा केला जातो, याचे पुरावे हाती लागल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच याबाबत निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह सादरीकरण करणार असल्याचेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार दिसून आले. त्यांच्याद्वारे भाजपने मतांचा घोळ करून महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली. कर्नाटकात आम्ही ही चोरी पकडली आहे. मी तुम्हाला, इलेक्शन कमिशनला हे अगदी ब्लॅक अँड व्हाईट रुपात स्पष्टपणे ही मतचोरी कशी होते ते दाखवून देऊ.
आमच्या हातात पुरावे आहेत. त्यांनाही ते कळून चुकले आहे की ही चोरी आमच्या लक्षात आली आहे. कर्नाटक निवडणुकीतील अगदी ब्लॅक अँड व्हाईट पुरावे आमच्या हातात आहेत.
आम्ही लोकसभा मतदानावेळचा एक मतदारसंघ निवडला आणि त्यात खोलात जाऊन तपास केला. कारण अडचण अशी आहे की, हे लोक मतदार यादी कागदावर देतात. आणि या यादीचे विश्लेषण केले जाऊ शकत नाही. मग एका मतदारसंघातील सर्व मतदार यादी आम्ही घेतली.
त्याला डिजिटल फॉरमॅट करून घेतला. त्यात आम्हाला सहा महिने लागले. पण आम्ही आता यांची सगळी चोरी पकडली आहे. हे कसे केले जाते, कोण मतदान करते, कुठून मतदान होते, कसे नवीन मतदार बनवले जातात, हे सगळं आता आम्हाला कळलं आहे.
आणि आता सरकारलाही ही गोष्ट कळून आली आहे. त्यामुळे आता ते बिहारमध्ये सर्व मतदान यंत्रणा नव्याने करण्याच्या मागे लागले आहेत. जुने मतदार डिलीट करून नव्या पद्धतीने मतदारांची नावे घेतली जात आहेत. नवीन मतदार यादी केली जात आहे. भारतात निवडणूकच चोरली जात आहे. हेच भारताचे वास्तव आहे.
राहुल गांधी यांनी “Match‑fixing Maharashtra” या शीर्षकाने 7 जून 2025 रोजी लेख लिहिला. त्या लेखात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावर ‘match‑fixing’ चा आरोप केला होता. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, मतदार याद्या वाढवून खोटे (fake) मतदार घडवणे, निवडणूकानंतर अचानक लाखो नव्या मतदारांची भरभराट, मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेले मतदान,
वाढलेली मतदानाची आकडेवारी, प्रलोभनांचा वापर, खोटे मतदान, पुरावे लपवणे, मशिन‑योग्य मतदार यादी प्रसारित करू न देणे व मतदानाच्या सीसीटीव्ही फुटेज लपवणे, असे आरोप त्यांनी लेखातून केले होते. मराठी दैनिकातही हा लेख छापून आला होता.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्तमान पत्रात लेख लिहूनच राहुल गांधींच्या लेखांचा प्रतिवाद केला होता.