

Rahul Gandhi On Parth Pawar Row:
महाराष्ट्रात गाजत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आता राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत पार्थ पवार यांच्या कंपनीनं केलेल्या बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणावरून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'महाराष्ट्रात १८०० कोटीची जमीन जी दलितांसाठी आरक्षित होती. ती मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रूपयांमध्ये विकण्यात आली आहे. त्यातच त्यावर स्टॅम्प ड्युटी देखील हटवण्यात आली. म्हणजे एक तर जमीन लुटली अन् त्यावर कायदेशीर सूट अन् मोहरही उटमवली.
ते आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, 'ही जमीन चोरी त्या सरकारनं केली आहे ती स्वतः मत चोरी करून सत्तेत आलं आहे. त्यांना माहिती आहे की कितीही लुटलं तरी मत चोरी करून पुन्हा ते सत्तेत परतणार आहेत. त्यांना ना लोकशाहीची काळजी आहे ना दलितांच्या अधिकारांची काळजी आहे. मोदीची तुमचं गप्प राहणं बरंच काही सांगून जात आहे. तुमचं सरकार या लुटारूंवरच टिकलं आहे म्हणूनच तुम्ही गप्प आहात का?'
दरम्यान, पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतनाची जमीन खरेदी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे. दरम्यान, पुण्याच्या तहसीलदारांचं या प्रकरणी निलंबन देखील झालं आहे.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया केली. मात्र यात पार्थ पवार यांचं नाव नसल्यानं विरोधक टीका करत आहेत. सरकार हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. तर अजित पवार यांनी देखील या प्रकरणी मौन सोडलं असून या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मी कोणत्याही नातेवाईकाच्या कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही असं स्पष्ट केलं आहे.