

Rahul Gandhi
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै रोजी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.
राहुल गांधी यांनी पत्रात दावा केला की, आंदोलनादरम्यान पेललेट गनचा वापर करण्यात आला असून, १९ वर्षीय एका विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या विद्यार्थ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
पत्रात राहुल गांधी यांनी अमित शाह यांना दोन प्रश्न विचारले आहेत. "दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अखेर गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे गृहमंत्री म्हणून विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरण्यास तुम्ही मंजुरी दिली होती का? जर नाही, तर ही परवानगी कोणी दिली?" असा सवाल त्यांनी केला आहे.
याशिवाय आंदोलनादरम्यान साध्या वेशातील काही व्यक्ती विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करताना दिसत असल्याचा उल्लेख करत, "हे लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांची नियुक्ती कोणी केली?" अशीही विचारणा राहुल गांधी यांनी केली.
लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करत राहुल गांधी म्हणाले की, आंदोलकांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या मागण्यांवर संवादातून तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांवर झालेली हिंसक कारवाई लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असून, देशभरात संतापाची लाट उसळल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी शनिवारी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान जखमी झाल्याचा दावा करण्यात आलेल्या साहिल नावाच्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर केला. पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, "हातात तिरंगा घेऊन स्वच्छ आणि पारदर्शक परीक्षा व्हावी, एवढीच मागणी करणाऱ्या साहिलवर पोलिसांनी पेलेट गन चालवून गंभीर जखमी केले. ही ब्रिटिश राजवटीची क्रूरता नाही, तर स्वतंत्र भारतातील मोदी सरकारची निर्दयी वागणूक आहे. आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायाऐवजी पेलेट मिळत आहेत."
या आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ११८ हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सुमारे ६० आंदोलकही जखमी झाल्याचे वृत्त आहे.