

Rahul Gandhi launch VoteChori.in website for complaints
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरून गंभीर आरोप करत नव्या आंदोलनाची सुरुवात केली आहे.
त्यांनी ‘मत चोरी’ म्हणजेच ‘Vote Chori’ या नावाने एक वेबसाईट सुरू केली असून, नागरिकांनी आयोगावर दबाव टाकावा, यासाठी जनतेला आवाहन केलं आहे.
"Vote Chori ही ‘एक माणूस, एक मत’ या मूलभूत लोकशाही संकल्पनेवर आघात आहे," असं राहुलr गांधींनी ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) वर म्हटलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, "स्वच्छ आणि पारदर्शक मतदार यादीशिवाय निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होऊ शकत नाहीत.
आमची मागणी स्पष्ट आहे – निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी जाहीर करावी, जेणेकरून जनता व राजकीय पक्ष स्वतः याची तपासणी करू शकतील."
त्यांनी यासाठी http://votechori.in/ecdemand या वेबसाईटला भेट देण्याचं किंवा 9650003420 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचं आवाहन केलं आहे.
राहुल गांधींच्या मते, 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मत चोरी’ झाली असून संपूर्ण प्रक्रिया ‘पूर्वनियोजित’ होती आणि ती भाजपच्या फायद्यासाठी रचली गेली होती. काँग्रेसच्या अंतर्गत विश्लेषणानुसार, कर्नाटकमध्ये 16 जागा जिंकण्याचा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात केवळ 9 जागा काँग्रेसने जिंकल्या.
विशेषतः महादेवपूरा मतदारसंघामध्ये 1,00,250 मतदारांची डुप्लिकेट नोंद, बनावट पत्ते व एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नोंदणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अपप्रवृत्ती आढळल्या, असा दावा राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सादरीकरण करून केला होता.
निवडणूक आयोगाने मात्र राहुल गांधींना आव्हान दिलं आहे की, जर त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर 1960 च्या मतदार नोंदणी नियमांनुसार स्वाक्षरी असलेलं शपथपत्र सादर करावे. अन्यथा त्यांनी देशाची माफी मागावी, असं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.
राजकीय प्रतिक्रिया
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटले आहे की, "पराभव स्वीकारण्याऐवजी काँग्रेस निवडणूक आयोग या संस्थेला बदनाम करत आहे." त्यावर कर्नाटकमधील काँग्रेसचे मंत्री जी. परमेश्वर यांनी राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी राज्यात त्यांच्या वतीने औपचारिक तक्रार करण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार (NCP-SCP) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला आहे.
त्यांनी खुलासा केला होता की, महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून "288 पैकी 160 जागा जिंकून देऊ" अशी ऑफर दिली होती, पण ही ऑफर त्यांनी व राहुल गांधींनीही नाकारली, असं पवार म्हणाले होते.
राहुल गांधींच्या या मोहिमेमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 'Vote Chori' मोहिमेच्या माध्यमातून मतदार जनतेमध्ये जागृती घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत या मुद्यावर देशात मोठे राजकीय चर्चेचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.