

Rahul Gandhi Statement: लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आठ वर्षापूर्वी पनामा पेपर लीक संदर्भात एक विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानचे यांचा मुलगा कार्तिकेय सिंह यांच्याबाबत हे वक्तव्य केले होते. आता राहुल गांधी यांनी या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला आहे त्यामुळं या प्रकरणाला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. खेद व्यक्त करणारा अर्ज राहुल गांधी यांच्यासंदर्भात कोर्टात सादर करण्यात आला आहे.
हे संपूर्ण प्रकरण केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय सिंह चौहान यांनी मानहानीचा दाव्याशी संबंधित आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाचे जस्टीस प्रमोद कुमार या एक सदस्याच्या पीठाने गुरूवारी महत्वाची सुनावणी घेतली.
मध्य प्रदेशच्या २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झाबुला इथं राहुल गांधीने पनामा पेपर लीकचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचा कार्तिकेय सिंह चौहानचे नाव घेतले होते. कार्तिकेय सिंह चौहान यांनी भोपाळच्या विशेष एमपी एमएलए कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला. त्यांनी माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला मोठी ठेच पोहचली असल्याचा दावा केला होता.
एमपी एमएलए कोर्टने या प्रकरणाची दखल घेत राहुल गांधी यांना २५ जून रोजी वैयक्तिकरित्या कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र यातून सूट मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी अर्ज केला होता. बुधवारी यावर आंशिक सुनावणीनंतर गुरूवारी सविस्तर सुनावणी घेण्यासाठी तारीख दिली.
मात्र या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच राहुल गांधी यांच्या वकिलांनी कोर्टासमोर स्पष्ट केलं की राहुल गांधी यांचे हे वक्तव्य शिवराजसिंह चौहान यांच्या कुटुंबीयांविरूद्ध नव्हते. त्यांचा याबाबत गैरसमज झाला आहे. राहुल गांधी यांनी सफाई देत लेखी अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला. आता कार्तिकेय चौहान यांना याबाबत लेखी उत्तर देण्यास कोर्टानं सांगितलं आहे.
राहुल गांधी यांच्यातर्फे सादर केलेल्या अर्जात राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला. त्यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करत हेही स्पष्ट केलं आहे की त्यांचे विधान हे तक्रारदार कार्तिकेय चौहान यांच्याविरूद्ध नव्हते. राहुल गांधी यांच्या या लेखी उत्तारावर आता तक्रारदार कार्तिकेय कडून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने यावर लेखी प्रतिक्रिया देण्यास सांगितलं आहे.
मानहानी प्रकरणाची गांभिर्य पाहून उच्च न्यायालय आज या प्रकरणी सुनावणी करू शकते. त्यामुळं राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस कायदेशीर लढाईच्या दृष्टीकोणातून महत्वाचा आहे. कारण त्यांना या प्रकरणात २५ जून पर्यंत वैयक्तिकरित्या कोर्टात हजर रहायचं होतं. आता या प्रकरणी आज सविस्तर सुनावणी होणार असल्यामुळं राजकीय क्षेत्राचे याकडे बारीक लक्ष असणार आहे.