नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी विचारपूर्वक राजकारण करत आहेत, असे वक्तव्य करत भाजप नेत्या यांनी कौतुक केले. राहुल गांधी यांचे राजकारण आता बदलले असून ते आता बोलताना किंवा एखादी कृती करताना विचारपूर्वक करतात, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी चक्क राहुल गांधी यांचे कौतुक केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
स्मृती इराणी यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी संसदेत येताना पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालतात, याद्वारे तरुण पिढीला आपण काय संदेश देतो आहे, हे त्यांना माहिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ते विचारपूर्वक करतात. बोलतानाही ते खूप सांभाळून बोलतात.
राहुल गांधी यांचे राजकारण तुम्हाला आवडत असले किंवा नसेलही किंवा तुम्हाला ते बालिशपणा वाटत असेल, पण आता ते वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत, हे आपण मान्य करायला हवे. त्यांना आता यश मिळू लागले आहे, असेही इराणी म्हणाल्या. ज्या विधानांमुळे वाद निर्माण होईल,अशी विधाने राहुल गांधी जाणीवपूर्वक करतात. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ते असे करतात. मुळात अशा विधानांचा सरकारशी काहीही संबंध नाही, हे राहुल गांधी यांनाही माहिती आहे. पण तरीही ते विधाने करतात, असेही इराणी म्हणाल्या.