गुवाहाटी; वृत्तसंस्था : काँग्रेसची भारत जोडो न्याययात्रा सोमवारी नवव्या दिवशी आसाममधील नगावात पोहोचली. यावेळी राहुल गांधी बोर्दोवा धानमधील संत श्री शंकरदेव जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते; मात्र त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही. यानंतर संतप्त झालेले राहुल गांधी धरणे आंदोलनाला बसले आणि रस्त्यावरच आरती केली.
राहुल गांधी म्हणाले की, मी कोणता गुन्हा केला आहे, ज्यामुळे मी मंदिरात जाऊ शकत नाही. मंदिरात कोण जाऊ शकेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार काय? सध्या केवळ एक माणूस (मोदी) मंदिरात जाऊ शकतो काय? माझा शंकरदेव यांच्या विचारधारेवर विश्वास आहे. ते आमच्या गुरुस्थानी आहेत. त्यामुळेच मी विचार केला होता की, ज्यावेळी मी आसामला जाऊ, त्यावेळी त्यांचे दर्शन नक्की घेऊ व त्यांचा आशीर्वाद घेऊ. मला 11 जानेवारी रोजी मंदिराच्या दर्शनाचे आमंत्रण मिळाले होते; पण मला रविवारी सांगण्यात आले की, मी शंकरदेवांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो, तर तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल.
राहुल गांधी 11 जानेवारीपासून शंकरदेव मंदिरात दर्शन घेण्यास इच्छुक होते. त्यामुळे आमचे दोन आमदार मंदिर समितीला भेटले होते. आम्ही 22 जानेवारीला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंदिरात येणार असल्याचे सांगितले होते. आमचे जोरदार स्वागत करू, असेही सांगण्यात आले होते.
– जयराम रमेश