

Rahul Gandhi On Dharmendra Pradhan resignation
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत, हा "भारताच्या भविष्याचा विजय" असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर सतत आघात होत आहेत. आता सरकारने यात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हा आपल्या विद्यार्थ्यांचा विजय आहे. हेच भारताचे भविष्य आहे. ज्या शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण जगाला अभिमान होता, त्या व्यवस्थेवर गेल्या काही वर्षांपासून हल्ले सुरू आहेत. शिक्षण व्यवस्थेवर कब्जा मिळवला जात असून तिचे खासगीकरण केले जात आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन ही याच बाबींची प्रतिक्रिया होती. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेचा विनाश आणि अकार्यक्षमतेचे प्रतीक बनले होते, अशी टीकाही राहुल गांधी केली.
"धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे भागच होते आणि ते गेले हे उत्तमच झाले. मात्र, आता शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलावी लागतील. भारतातील शिक्षण व्यवस्थेवर 'आरएसएस'चा (RSS) कब्जा असणे ही एक मोठी समस्या आहे. यामध्ये मोदीजींची चूक असेल, तर तितकीच चूक आरएसएसचीही आहे."
"हा देश भारतातील जनतेचा आणि संविधानाचा आहे. या सर्व शैक्षणिक संस्था तुमच्या मालकीच्या नाहीत. जर तुम्ही याच मार्गाने पुढे जात राहिलात, तर आता जे घडले आहे, त्यापेक्षा दहा पटीने मोठी प्रतिक्रिया तुम्हाला पाहायला मिळेल. हाच आजचा मुख्य संदेश आहे," असेही ते म्हणाले.
२० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीमार आणि पोलिसांच्या कारवाईवरून राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष हा मुद्दा तीव्रतेने लावून धरेल, असा दावा त्यांनी केला. "विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारासाठी आम्ही थेट अमित शाह यांना जबाबदार धरतो. त्यांनीच विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आणि पेलेट गनसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्याचे आदेश दिले. आमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचीच दले (पोलीस) भारताच्या भविष्यावर (विद्यार्थ्यांवर) गोळ्या झाडत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. संसदेत यावर जोरदार आवाज उठवला जाईल," असे गांधी म्हणाले.
"मी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांना जेव्हा आणि जिथे माझी गरज भासेल, तिथे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. भारताचे भविष्य आणि विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही लढाई 'भूतकाळ' असलेल्या नरेंद्र मोदी व आरएसएस आणि 'भविष्य' असलेल्या भारत यांच्यातील आहे; आणि भारताचे भविष्य या भूतकाळाचा नक्कीच पराभव करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.