

Rahul Gandhi
नवी दिल्ली : जातनिहाय जनगणना होईल तेव्हा राहुल गांधींनाही आपली जात सांगावी लागेल, असे म्हणत भाजप नेते मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच राहुल गांधी हिंदू विरोधी आहेत म्हणून ते हिंदू विरोधी वक्तव्य करतात, अशीही टीका मनोज तिवारी यांनी केली.
भाजप नेते खासदार मनोज तिवारी दिल्लीत बोलताना म्हणाले की, राहुल गांधी हे सनातन आणि हिंदूविरोधी आहेत, म्हणूनच ते हिंदूंविरुद्ध विधाने करतात. त्यांचा सनातन धर्मावर विश्वास नाही, ते केवळ ढोंग करतात, असेही तिवारी म्हणाले. दरम्यान, राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मागील महिन्यात राहुल गांधी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात गेले होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रभू श्रीराम यांना काल्पनिक म्हटले. यावरूनही मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडले. तिवारी म्हणाले की, राहुल गांधी यांची विचारसरणी हिंदूविरोधी आहे. ते सनातनविरोधी आहेत. मात्र आम्ही रामचरितमानस प्रत्येक घरात घेऊन जाऊ, असेही ते म्हणाले.
मनोज तिवारी म्हणाले की, केंद्र सरकारने अलीकडेच देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात आनंदाची लाट आहे. इंडिया आघाडीत समाविष्ट असलेले काँग्रेस-समाजवादी पक्षासह इतर पक्ष याला त्यांचा विजय म्हणत आहेत. विरोधी पक्षात असताना ते जातीय जनगणनेबद्दल बोलतात. मात्र श्रेय घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेले काँग्रेससह सर्व पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांना जातनिहाय जनगणना करण्याचे आठवले नाही का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.